विजय लाड
कोयनानगर – कोयना विभागात येणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा, पर्यटकांना मोहिनी घालणारा, तसेच वन्यजीव विभागाला दरवर्षी 10 लाखांचा महसूल मिळवून देणाऱ्या ओझर्डे धबधब्याच्या व्यवस्थापनावरून वन्यजीव विभाग व नवजा ग्रामस्थांमध्ये अनेक दिवसांपासून चाललेला सुप्त संघर्ष अखेर चव्हाट्यावर आला आहे.
ओझर्डे धबधब्याचा हा वाद विकोपाला गेल्यामुळे वन्यजीव विभागाने हा नयनरम्य धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांना बंदी केली आहे. वन्यजीव विभागाच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे बहरुन जोमात येणाऱ्या कोयनेचे पर्यटन पुन्हा कोमात जाणार आहे. सह्याद्रीच्या कुशीतील नवजा येथे ओझर्डे धबधबा निसर्गाचा अनमोल ठेवा आहे.
पावसाळा सुरु झाल्यामुळे ओझर्डे धबधबा प्रवाहित झाल्यामुळे कोयना भागाचे व पर्यटनाचे सौंदर्य खुलून पावसाळी पर्यटनाला बहर आला आहे. या धबधब्याला पर्यटकांकडून अन्यन्यसाधारण महत्व देण्यात येते. दरवर्षी पावसाळ्यामध्ये 5 महिन्यांत याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमुळे ओझर्डे धबधबा वन्यजीव विभागाला तब्बल 10 लाख रुपयांचा महसूल संकलित होतो. त्यामुळे हा धबधबा जणू वन्यजीव विभागासाठी सोन्याची कोंबडी ठरत आहे. 27 एकर क्षेत्रात असणाऱ्या या धबधब्याचे व्यवस्थापन नवजा गावातील जनवन कमिटी व नवजा ग्रामस्थांनी आपल्याकडे द्यावी, अशी लेखी मागणी वन्यजीव विभागाकडे सहा महिन्यांपूर्वी केली आहे.
परंतु, वन्यजीव विभाग हा धबधबा जनवन कमिटी व ग्रामस्थांकडे देण्यास तयार नाही. तसेच यासाठी कोअर झोनमधील निसर्ग पर्यटन जनवन समितीकडे देता येणार नसल्याचे कारण सागत आहे. अशा प्रकारची कारणे देत असताना वनखात्यानेच त्यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या कास, ठोसेघर, महाबळेश्वर आणि इतर वन व्यवस्थापन कमिटीकडे तिथले व्यवस्थापन दिले असून ओझर्डे धबधब्याबाबतच नकारघंटा का, असा सवाल ग्रामस्थ व जनवन समितीकडून विचारला जात आहे. वन्यजीव विभागाच्या या निर्णयाला नवजा ग्रामस्थांनी केलेल्या प्रखर विरोधामुळे वन्यजीव विभागाने हा धबधबा पर्यटकांसाठी बंद केला आहे. यामुळे नवजा ग्रामस्थ व वन्यजीव विभागामध्ये चाललेला सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. वन्यजीव विभाग स्थानिकांच्या विकासाला कडाडून विरोध करत असल्याने या धबधब्याचे व्यवस्थापन स्थानिक ग्रामस्थ व जनवन समितीकडे देण्यास टाळाटाळ करत असल्याचे अधोरेखित होत असल्याचा आरोपही ग्रामस्थ करत आहेत.
नवजा ग्रामस्थ व जनवन समितीने केलेल्या मागणीला मंजुरी देण्याचा अधिकार आम्हाला नसून तो स्थानिक सल्लागार समितीला आहे. मागणीचा प्रस्ताव आम्ही मंजुरीसाठी या समितीकडे सादर केला आहे. त्यास समितीने मान्यता दिल्यानंतर या धबधब्याचे व्यवस्थापन नवजा ग्रामस्थ व जनवन समितीकडे दिले जाईल. नवजा ग्रामस्थ, जनवन समिती व वन्यजीव विभागाची उद्या बुधवारी कोयनानगर येथे बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये या प्रश्नावर सविस्तर चर्चा होईल.
उत्तम सावंत, उपसंचालक, सहयाद्री व्याघ्र प्रकल्प
स्थानिकांसह पर्यटकांनाही लाभ मिळण्यासाठी शासनाने पर्यटन धोरण आखले आहे. त्यामध्ये स्थानिक रहिवाशांचा सहभाग हे निसर्ग पर्यटनाचे मूळ तत्व आहे. पर्यटकांना सेवा देवून स्थानिकांना स्वयंरोजगार मिळवावा हा उद्देश नवजा ग्रामस्थ व जनवन समितीचा आहे. स्थानिकांचा विकास व्हावा, यासाठी ओझर्डे धबधब्याचे व्यवस्थापन आम्ही वन्यजीव विभागानेच तयार केलेल्या जनवन समितीकडे द्यावे, अशी मागणी केली आहे.
महेश शेलार, अध्यक्ष, जनवन समिती, नवजा