जगण्याचे संकट असताना विक्रेत्यांकडे हप्त्याची मागणी

मयूर सोनावणे
आनेवाडी टोलनाक्‍यावरील प्रकार, विक्री सुरू करण्यासाठी ठराविक रक्कम देण्याचा ठेकेदाराचा फतवा

सातारा – आनेवाडी टोल नाक्‍यावरील विक्रेत्यांची विक्री बंद असल्यामुळे त्यांच्या उपजिविकेचा प्रश्‍न निर्माण झाला असतानाच विक्री पुन्हा सुरू करण्यासाठी ठेकेदाराने हप्त्याचा फतवा काढल्याने विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यावर कढी करत या फतव्याची माहिती कुणासाही कळता कामा नये, असा सज्जड दम या ठेकेदाराने विक्रेत्यांना दिला आहे.

आनेवाडी टोल नाक्‍यावर एक ते दीड महिन्यापूर्वी सफाई कर्मचाऱ्याचा तोल जाऊन ट्रकखाली पडल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर विक्रेत्यांनी दोन दिवस स्वत:हून विक्री बंद ठेवली होती. मात्र, व्यवस्थापनाने विक्रेत्यांनाच विक्री करण्यास बंदी केली. विक्री चालू होण्यासाठी हातावर पोट असलेल्या या विक्रेत्यांचे खासदार, आमदार तसेच इतर नेत्यांकडे हेलपाटे सुरु आहेत. यावर लवकरच निर्णय होईल.

मात्र, आता व्यवस्थापनाकडून या विक्रेत्यांना विक्री चालू करण्यासाठी ठराविक स्वरूपात पैशांची मागणी केली जात असल्याची माहिती काही विक्रेत्यांनीच नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. आनेवाडी टोलनाक्‍यावर सध्या या विषयाची जोरदार चर्चा सुरु आहे. एकंदरीतच विक्रेत्यांच्या विक्रीला व्यवस्थापनाच्या हप्तेखोरीचे ग्रहण लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

महामार्गाच्या रुंदीकरणात चारपदरी आणि सहापदरीकरणात आनेवाडी तसेच विरमाडे ग्रामस्थांच्या जगण्याचे संकट असताना विक्रेत्यांकडे हप्त्याची मागणी
जमिनींचे संपादन झाले. मात्र, या दोन्ही गावांच्या मध्यावर उभारण्यात आलेल्या टोलनाक्‍यामुळे येथील ग्रामस्थांच्या विशेषत: विरमाडे ग्रामस्थांच्या जमिनींचे अधिक प्रमाणात संपादन झाले.

या जमिनींच्या बदल्यात संबंधितांना ठराविक पैसे देण्यात आले. मात्र, मुळातच शेतीच्या जीवावर उदरनिर्वाह करणाऱ्या अनेकांना जमिनीच राहिल्या नसल्याने उपासमारीची वेळ आली. परिस्थितीशी दोन हात करत विरमाडे, आनेवाडीतील ग्रामस्थांनी, तरुणांनी टोलनाक्‍यावर खाद्यपदार्थ विक्री सुरु करुन आपला उदरनिर्वाह करण्याचा मार्ग शोधला.

कालांतराने या दोन्ही गावांसह परिसरातील इतर गावांमधील बेरोजगार तरुण याठिकाणी खाद्य पदार्थांसह इतरही वस्तूंची विक्री करु लागले. शिक्षण असतानाही रोजगार मिळत नसलेल्या तरुणांना टोलनाक्‍यावरील विक्रीच्या रुपाने रोजगार उपलब्ध झाला. मात्र, टोलनाक्‍यावर घडणाऱ्या अपघातांचे कारण दाखवत विक्रेत्यांकडूनच पैसे गोळा करण्याचा डाव आता व्यवस्थापनातीलच ठेकेदाराने आखला आहे.

त्यामुळे या विक्रेत्यांच्या पोटावर पाय आला आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापासून या विक्रेत्यांची विक्री बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह नेमका करायचा तरी कसा, असा प्रश्‍न या विक्रेत्यांपुढे आहे. विक्री पुन्हा चालू व्हावी, यासाठी विक्रेत्यांनी खासदार उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्याकडे धाव घेतल्याचे सांगितले जाते.

मात्र, विक्रेत्यांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी कोणीही म्हणावा तितका सकारात्मक पुढाकार घेतेलेला नाही. गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी हे विक्रेते मकरंद पाटील यांच्याकडे गेले होते. यावेळी पाटील यांनी थेट रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवरुन संपर्क साधला. तसेच विक्रेत्यांना विक्रीसाठी परवानगी मिळण्याची मागणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे विक्रीचा प्रश्‍न लवकरच निकालात लागेल, अशी आशा विक्रेत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

मात्र, या घटनेनंतर व्यवस्थापनातील एका ठेकेदाराने आनेवाडी येथील विक्रेत्यांना गोळा करुन “तुम्ही मला महिन्याला ठराविक रक्कम गोळा करुन द्या आणि विक्री सुरु करा,’ असा नवीनच फतवा काढला आहे. विशेष म्हणजे ही बाब कोणासही कळता कामा नये, असा दमदेखील संबंधित ठेकेदाराने विक्रेत्यांना भरला आहे. विरमाडे गावातील विक्रेत्यांनी थेट ठेकेदारालाच “आम्ही पैसे देणार नाही,’ असे ठणकावून सांगितले आहे.

“रक्कम द्या आणि विक्री करा…’ ठेकेदाराचा दम!

विक्रीचा प्रश्‍न लवकरच निकालात लागेल, अशी स्थिती दिसू लागल्यावर व्यवस्थापनातील एका ठेकेदाराने “तुम्ही मला महिन्याला ठराविक रक्कम गोळा करुन द्या आणि विक्री सुरु करा,’ असा नवीनच फतवा आनेवाडी येथील विक्रेत्यांना काढला आहे. विशेष म्हणजे ही बाब कोणासही कळता कामा नये, असा दमदेखील संबंधित ठेकेदाराने विक्रेत्यांना भरला आहे. विरमाडे गावातील विक्रेत्यांनी थेट ठेकेदारालाच “आम्ही पैसे देणार नाही,’ असे ठणकावून सांगितले आहे. 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.