नाणे मावळ, (वार्ताहर) – दुष्काळाच्या झळा ग्रामीण भागातील मेंढपाळांना जाणवू लागल्या आहेत. पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पाणीदार तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळ तालुक्याकडे मेढपाळांनी आपला मुक्काम हलविला आहे. मेंढपाळ बांधवांना मेंढ्यांच्या चाऱ्याबरोबरच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढल्याने गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यासह राज्यातील इतर ठिकाणाच्या शेत शिवारातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने मेंढपाळ बांधवांना मेंढ्यांना पाण्यासाठी चार ते पाच किलोमीटर भटकंती करावी लागत आहे. ग्रामीण भागात भारनियमनामुळे ज्या दिवशी रात्रीची वीज असेल त्या दिवशी तर मोठ्या प्रमाणावर या बांधवांना मेंढ्यांना पाण्यासाठी तजवीज करावी लागते.
अनेक ठिकाणी शेतमाळ्यांमध्ये प्लॅस्टिकचे ड्रम तसेच प्लॅस्टिक कागद, ताडपत्री जमिनीत अंथरूण त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस पाणी अडवून मेंढ्यांना पाणी देण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे. सध्या या भागात चारा तसेच पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने मेंढपाळांनी सध्या मावळ तालुक्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.
घरचा रस्ता विसरण्याची वेळ
पावसाने सुरुवातीपासूनच दांडी मारल्याने हजारो मैल भटकंतीवर गेलेल्या मेंढपाळ कुटुंबियांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ आली आहे. कारण, मेंढ्या जगविण्यासाठी ज्या भागात पाऊस पडला आहे. त्या भागात या मेंढपाळांना चाऱ्याच्या शोधात निघावे लागले आहे. पाळीव जनावरांनाही सध्या चाराटंचाई भासत आहे.