उंब्रजची बाजारपेठ पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

दिलीपराज चव्हाण

राजकारणी व प्रशासनाचेही दुर्लक्ष; गावाच्या विकासात अडथळा

उंब्रज  – सुवर्णकाळ पाहिलेली उंब्रजची बाजारपेठ सध्या मरणासन्न अवस्थेत आहे. साडेतीन वर्षांपूर्वी अतिक्रमण हटविण्याताना झालेल्या कारवाईत दुकाने उद्‌ध्वस्त झाली आणि व्यापाऱ्यांचे जगणे अवघड झाले. आज ना उद्या पुनर्वसन होणार, या आशेवर हा वर्ग आलेला दिवस ढकलतोय; परंतु राजकीय नेते वा प्रशासन दखलच घेत नसल्याने व्यापारी वर्ग हतबल झाला आहे. बाजारपेठेतील मंदीमुळे गावाच्या विकासातही अडथळा निर्माण झाला आहे.

उंब्रजचे पन्नास व्यापारी भोळी आशा घेऊन जगतायत. त्यांची दुकाने वर्षानुवर्षे बाजारपेठेत उभी होती. त्यांचे भाडे ते ग्रामपंचायतींमध्ये भरत होते; परंतु महसूल विभागाच्या जागेवर आहेत म्हणून न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमणविरोधी कारवाईत दुकाने जमीनदोस्त झाली. अनेकांचे संसार उघड्यावर आले. भिंतींच्या मातीचा धुरळा शांत झाला तरी मनाच्या तळाशी बसलेला भीतीच्या धुरळ्याचे काय? पडझडीत अनेकांच्या अन्नात माती कालवली गेली. त्यांच्या पर्यायी जागेचे काय? व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाच्या फरतफेडीचे काय, असे प्रश्‍न साडेतीन वर्षानंतरही तसेच आहेत.

त्या मोहिमेनंतर उंब्रजमध्ये अनेक राजकीय कार्यक्रम झाले. त्यात येणाऱ्या राजकीय मंडळी व शासकीय अधिकाऱ्यांनी बाधित व्यापाऱ्यांना नुसती स्वप्ने दाखवली. गाळेधारकांच्या संघटनेची कायदेशीर लढाई सुरू आहे, पण ती किती दिवस चालणार आणि पुढे काय होईल, हे माहीत नाही. या बाजारपेठेने अनेकांचे संसार सुखाचे केले होते. आज तीच बाजारपेठ बकाल, विद्रुप झाली आहे. त्याचा परिणाम गावच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे.

परिसरातील लोक खरेदीसाठी कराड, सातारा, पाटणकडे वळल्याचे चित्र आहे. आजूबाजूच्या वाड्यावस्त्या आणि गावांमधील ग्राहकांची उंब्रजच्या बाजारपेठेला पहिली पसंती होती. बारशापासून मुंजीपर्यंत, लग्नापासून तेराव्यापर्यंत, शेतीपासून घरापर्यंत लागणारे साहित्य येथे मिळत होते. मात्र, 25 फेब्रुवारी 2016 रोजी ही बाजारपेठ उद्‌ध्वस्त झाली. शिवरायांच्या पुतळ्यासमोरच सरकारी यंत्रणेने सुलतानी संकट आणून छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या दुकानांवर जेसीबीरूपी नांगर फिरवला होता.

व्यावसायिक डोळ्यात पाणी आणून हे पाहत होते. शिवसैनिक समीर जाधव यांनी थोडा विरोध केला, पण प्रशासन नमले नाही. खासदार उदयनराजे भोसले यांना बोलावण्यात आले. ते आल्यावर कारवाई थांबवण्यात आली; पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. होत्याचे नव्हते झाले होते. त्यानंतर या भग्न बाजारपेठेत अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा कार्यक्रम झाले. अनेक नेते, मंत्र्यांनी उंब्रजची बाजारपेठ पुन्हा उभारण्याची आशा दाखवली असली तरी या बाजारपेठेला गतवैभव पुन्हा मिळणार का, हा प्रश्‍न आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×