स्थायीचे आर्थिक “समाधान’ न झाल्याने वायसीएममध्ये औषधांचा कृत्रिम तुटवडा

संदीप घिसे

-नवीन औषध खरेदीचा करारनामा नाही
-जुन्या ठेकेदारांनी बंद केला पुरवठा
-भाजपचे हेच का ते अच्छे दिनः रुग्णांचा संतप्त सवाल

पिंपरी  – सध्या शहरात वेगवेगळ्या आजारांची साथ सुरू आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच महापालिकेच्या रुग्णालयात आणि दवाखान्यात औषधांचा तुटवडाही वाढत आहे. ही समस्या आजची नसून गेल्या सहा महिन्यांपासून औषधाचा तुटवडा जाणवत आहे. त्यात गेल्या 15 दिवसांपासून जुन्या ठेकेदारांनी औषधांचा पुरवठा बंद केल्याने औषध टंचाई अधिक तीव्र झाली आहे. स्थायीचे आर्थिक “समाधान’ न झाल्याने नवीन औषध खरेदीचा करारनामा झालेला नाही. यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. यामुळे “भाजपचे हेच का ते अच्छे दिन’ असा संतप्त सवाल रुग्ण विचारत आहेत. स्थायीच्या मनमानीपणामुळे सुरू झालेला औषधांचा तुटवडा रुग्णांच्या जिवावर बेतण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागास औषध पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांची मुदत ऑक्‍टोबर 2018 मध्ये संपुष्टात आली आहे. मात्र डॉक्‍टरांमधील अंतर्गत वादामुळे नवीन औषध खरेदीची प्रक्रिया वेळेवर होऊ शकली नाही. मुदत संपुष्टात आल्याने ठेकेदारांनी औषधांचा पुरवठा बंद केला. यामुळे रुग्णांचे हाल होऊ लागले. नवीन ठेकेदारांकडून पुरवठा होत नाही तोपर्यंत जुन्या ठेकेदारांना आयुक्‍तांनी मुदतवाढ दिली. मात्र पूर्वी एलबीटी प्रमाणे निविदा प्रकिया राबविलेल्या ठेकेदारांना नवीन जीएसटी करआकारणीप्रमाणे पुरवठा करणे शक्‍य नसल्याने त्यांनी यापूर्वीच हात आखडता घेतला होता. यामुळे काही जुने ठेकेदार औषध पुरवठा करण्यास राजी नाहीत.

ज्या ठेकेदारांना ऑक्‍टोबरपासून मुदतवाढ दिली आहे. त्यापैकी बहुतेकांची बिले एप्रिल महिन्यापासून थकित आहेत. ती बिले मिळाल्याशिवाय नवीन औषधे देणार नाही, असा पवित्रा काही ठेकेदारांनी घेतल्याने महापालिकेच्या रुग्णालये आणि दवाखान्यात आतापर्यंतचा सर्वांत तीव्र असा औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी थेट पद्धतीने काही औषध खरेदीला मान्यता दिली आहे. मात्र ती खरेदीही गेल्या काही दिवसांपासून बंद पडली आहे.

सुरू झाल्या हालचाली
याबाबत दैनिक “प्रभात’ने प्रशासनाकडे प्रतिक्रिया विचारल्यानंतर सर्व संबंधितांना खडबडून जाग आली. शुक्रवार दुपारनंतर अचानकच करारनामा सीलबंद करण्याच्या प्रक्रियेला वेग आला. तातडीने करारनामा करुन औषध पुरवठा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

…अन्यथा कामच नको
महापालिका 643 प्रकारची विविध औषधे 19 पुरवठादारांकडून साडे सोळा कोटी रुपयांच्या खरेदीला 12 जुलै रोजीच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मात्र स्थायीचे समाधान न झाल्याने पुरवठादारांचे करारनामे अजूनही झालेले नाहीत. ठेकेदार कमीत कमी नफा ठेवून निविदा भरतात. यापैकी दहा टक्‍के जर वाटण्यात गेले तर नफा किती कमवायचा आणि वाटप किती करायचे, असा प्रश्‍न ठेकेदारांसमोर निर्माण झाला आहे. ठरलेल्या टक्‍केवारीपेक्षा अधिक देणार नाही. काम द्यायचे असेल तर द्या, अन्यथा आम्हाला कामच नको, अशी भूमिका काही पुरवठादारांनी घेतल्यामुळे करारनामा करण्यात आलेला नसल्याचे आज समोर आले आहे.

करारनाम्यासाठी लागतात फक्‍त पाच मिनिटे
स्थायी समितीने मान्यता दिल्यावर करारनामा तयार होऊन येतो. त्यावर स्थायी समितीचे दोन सदस्य आणि नगरसचिव यांची स्वाक्षरी लागते. हे काम अगदी पाच मिनिटांमध्ये होऊ शकते. औषध खरेदीच्या फाईलीनंतर आलेल्या कित्येक खरेदीचा करारनामा झाला आहे. मात्र याच खरेदीचा करारनामा करण्यास उशीर का, असा सवाल उपस्थित होत आहे.

स्थायी समितीने मान्यता दिलेल्या 16 पुरवठादारांच्या फाईल करारनाम्यासाठी 6 ते 20 ऑगस्ट दरम्यान टप्प्या-टप्प्याने नगरसचिव विभागाकडे पाठविल्या आहेत. त्या अद्याप पूर्तता करून आलेल्या नाहीत. यामुळे आता त्या फाईल आयुक्‍तांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

-मंगेश चितळे, सहाय्यक आयुक्‍त – भांडार विभाग

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.