पिंपरी – महापालिकेच्या मैलाशुद्धीकरण केंद्र आणि पंपिंग स्टेशनसाठी अखंडित वीजपुरवठ्यासाठी एक्सप्रेस फीडरची आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी तब्बल पावणेआठ कोटी रूपये खर्च होणार आहेत.
पालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत एक्सप्रेस फीडरची आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. टप्पा दोन मधील या कामासाठी इच्छुक ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. निविदा खर्च 8 कोटी 90 लाख रूपये अपेक्षित धरण्यात आला.
त्यानुसार, चार ठेकेदारांनी दरपत्रक सादर केले. त्यापैकी एस. टी. इलेक्ट्रिकल्स यांनी निविदा दरापेक्षा 16.47 टक्के कमी म्हणजेच 7 कोटी 43 लाख रूपये दर सादर केला. निविदेतील अटीनुसार त्यावरील वस्तू व सेवा कर वेगळा देण्यात येणार आहे. त्यानुसार, एस. टी. इलेक्ट्रिकल्स यांच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे.