महापालिकेच्या धोरणाचा परिणाम : भूईभाडे सहापट वाढविले
पिंपरी – सल्लागारांवर कोट्यवधींची उधळपट्टी तर सर्वसामान्यांना वेठीस धरण्याच्या महापालिकेच्या धोरणामुळे गणेश मूर्ती विक्रेत्यांवर संक्रांत ओढावली आहे. गणेश मूर्ती परवानगीसाठी महापालिकेकडून आकारले जाणारे भूईभाडे एक हजार रुपयांवरुन सहा हजार रुपये करण्यात आले आहे. प्रदूषण निर्मूलन शुल्काच्या नावाखाली ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मूर्तीच्या दरात वाढ झाली असून गणेश भक्तांवर महागाईचे “विघ्न’ ओढावले आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेश मूर्ती विक्रीसाठी विक्रेत्यांकडून शहरात तात्पुरत्या स्वरूपात स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. शहरातील विविध भागात दरवर्षी शेकडो स्टॉल्स उभारले जातात. महापालिकेकडून स्टॉल्सला परवानगी देताना भूईभाडे आकारले जाते. गतवर्षी एक हजार रुपये भूईभाडे अधिक जीएसटी (वस्तू व सेवा कर) असे परवाना शुल्क महापालिकेने आकारले होते. त्यामुळे अधिकृतपणे परवाना घेऊन स्टॉल्स उभारणाऱ्यांची संख्या वाढली होती. मात्र, यंदा महापालिकेने अचानकपणे सहा पटीने भूईभाडे वाढविले आहे.
स्टॉल्स उभारणीच्या खर्चात यंदा पंधरा टक्के वाढ झाली आहे. पूरग्रस्त परिस्थितीमुळे यंदा पेणहून गणेश मूर्तींची आवक घटली. प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रंगातील दरवाढीमुळे गणेश मूर्तीच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्के वाढ झाली आहे. त्यात महापालिकेने भूईभाडे म्हणून दीड हजार, प्रदूषण निर्मूलन शुल्काच्या नावाखाली साडे चार हजार रुपये आणि त्यावर अठरा टक्के जीएसटी असे एकूण मिळून सातपट वाढ झाली आहे. प्रदूषण निर्मूलन शुल्क आकारणीचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु, सततच्या ढगाळ वातावरणामुळे शाडू मातीच्या मूर्तीचेही उत्पादन घटले आहे. शाडू माती उपलब्ध होत नाही. त्यातच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत दुप्पट खर्च शाडू माती मूर्तीवर होत असतो.