टोकियो – करोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने देशवासी तसेच स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंचे आरोग्य जास्त महत्त्वाचे असल्याचे सांगत जपानचे नागरिक ऑलिम्पिक आयोजनाला आता उघडपणे विरोध करू लागले आहेत.या विरोधाला न जुमानता कोणत्याही परिस्थितीत ही स्पर्धा होणारच असे आयोजकांनी तसेच जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी निर्धारपूर्वक सांगितले आहे.
ऑलिम्पिकच नव्हे तर संपूर्ण जगासमोर धोका ठरत असलेल्या करोनावर सध्यातरी कोणताही उपाय सापडलेला नाही, त्यामुळे केवळ यजमानपद हातचे जाऊ नये व आर्थिक फटका बसू नये या कारणांसाठी खेळाडूंच्या बरोबरच देशातील नागरिकांच्या आरोग्याशी सरकार खेळ करत आहे, अशी टीकाही आता येथील नागरिक करत आहेत. विरोध मोडून ही स्पर्धा खेळविण्याचा अट्टहास कशासाठी अशी विचारणा आता येथील नागरिक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) करत आहेत.
करोनाचा संसर्ग वाढत आहे, त्यावर कोणतेही औषध अद्याप मिळालेले नाही. खेळाडूंचे आरोग्य महत्त्वाचे आहे का स्पर्धा. एकीकडे जागतिक स्तरावर अनेक महत्त्वाच्या स्पर्धा एकतर रद्द तरी करण्यात आल्या आहेत, तर काही स्पर्धांच्या वेळापत्रका बदल करुन त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मग हे चीत्र असतानाही आयोजक स्पर्धेसाठी इतके अतूर का असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
करोना विषाणूंचा धसका घेत अखेर आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धा सरू झाली. अर्थात या स्पर्धेला प्रेक्षकांना प्रवेश दिला गेलेला नाही. ही स्पर्धा आगामी ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी जगभरातील मुष्टियुद्धपटूंसाठी अत्यंत महत्त्त्वाची मानली जात आहे. या स्पर्धेनंतर आता परत पात्रता स्पर्धा होणार नसल्याने या स्पर्धेला महत्त्व प्राप्त झाले आहे. करोना विषाणूच्या धोक्यामुळे अनेक देशांनी विविध स्पर्धा पुढे ढकलल्या असून काही स्पर्धा रद्दही केल्या आहेत. आता हा धोका असतानाही केवळ खेळाडूंचे नुकसान होऊ नये यासाठी ही पात्रता स्पर्धा खेळविली जात आहे.