बंगळुरू – करोनाचा धोका असतानाही साईच्या (भारतीय क्रीडा प्राधिकरण) सराव शिबिरात भारतीय हॉकी संघातील पुरुष व महिला खेळाडूंचा सराव मात्र सुरू करण्यात आला आहे. साईच्या बंगळुरू येथील केंद्रात साईशी संबंधित व्यक्तींव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश देण्यात येत नसून जणू विलगीकरणातच हे खेळाडू सराव करत असल्याचे चीत्र दिसत आहे. येत्या 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत जपानमधील टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे.
करोनाचा धोका असल्याने ही स्पर्धा होणार का असा प्रश्न असला तरीही खेळाडूंनी आपल्या सरावात खंड पडू देऊ नये असे आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. खेळाडू, पदाधिकारी, प्रशिक्षक तसेच साईशी संबंधित व्यक्ती वगळता अन्य कोणालाही या शिबिरात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. माध्यमांच्या प्रतिनिधिंनाही परवानगीशिवाय येथे प्रवेश करता येणार नाही असेही साईने जाहीर केले आहे.