शौचालयाच्या निकृष्ट दर्जाची चौकशी करा : सरपंचांची मागणी
तळेगाव ढमढेरे – येथील वेळ नदीच्या पात्रालगतच्या शौचालयाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने या कामाची चौकशी करून त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी सरपंच ताई सोनवणे व ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांनी संबंधित विभागाकडे केली आहे. तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायतीने बाजार क्षेत्र उपअभियंता, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प, पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
आठवडे बाजार आवारातील पेव्हिंग ब्लॉक, संरक्षक भिंत व वेळनदी काठालगत स्वच्छतागृह ही कामे एक वर्षापूर्वी पूर्ण केली आहेत. पेव्हिंग ब्लॉक तुटलेले आहेत. स्वच्छतागृहाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने शौचालयाचे बांधकाम पडण्यास आले आहे. याची संबंधित विभागाने चौकशी करून दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी लेखी निवेदनाद्वारे संबंधित विभागाकडे केली आहे.
अनेक दिवसापासून बाजारातील ग्राहक व विक्रेते यांची स्वच्छतागृह नसल्याने गैरसोय होत होती. ही गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने जागतिक बॅंकेच्या माध्यमातून निधीही उपलब्ध केला. नागरिकांची स्वच्छतागृह बांधून सोयदेखील केली. परंतु स्वच्छतागृह बांधण्याची जागा वेळ नदीच्या काठालगत असल्याने धोकादायक होती. एकच वर्षात स्वच्छतागृहाला तडे गेल्याने बांधकाम मोडकळीस आले आहे. या ठिकाणी दुर्गंधीही पसरली आहे.