आज प्रचाराच्या तोफा थंडावणार: वेध आता मतदानाचे

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी जोमाने प्रचार केला आहे. दरम्यान आज संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. येत्या सोमवारी म्हणजे 21 ऑक्‍टोबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून प्रचारसभा, बाईक रॅली, पदयात्रा, सोशल मीडिया या सर्वच माध्यमातून राजकीय नेत्यांनी आणि उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आता मतदारांना आपला निर्णय घेऊन सोमवारी मतदान करायचे आहे.

राज्यातील लढत प्रामुख्याने भाजप-शिवसेना युती विरूद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी यांच्यामध्ये होत आहे. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष कशी कामगिरी करतात हे पाहणे सुद्धा उत्सुकतेचे असणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. उमेदवारी कोणाला मिळणार, कोणाचे तिकीट कापले जाणार याची चर्चा सुरू झाली होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेकांनी पक्षाच्या आदेशाविरोधात बंडखोरी केली. यापैकी काही बंडखोरांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर आपल्या तलवारी म्यानही केल्या. तर अनेकांनी आपले बंड कायम ठेवले.

प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ जाहीर सभा घेतल्या. यामध्ये त्यांनी सातारा, पुणे, परळी, मुंबई या ठिकाणी घेतलेल्या सभा गाजल्या. तर दुसरीकडे भरपावसात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी संध्याकाळी साताऱ्यात घेतलेली सभा अनेकांच्या मनात घर करून गेली. वयाच्या 79 वर्षी शरद पवार यांनी घेतलेल्या या सभेची चर्चा सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात रंगली. शरद पवार यांनीही गेल्या दोन आठवड्यात राज्यात झंझावती प्रचार दौरा केला.

भाजचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या सभांमधून शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांमध्येही त्यांनी सरकारने केलेल्या कामाचा पाढा वाचताना विरोधकांवर जोरदार टीका केली. कलम 370 रद्द करण्याचा मुद्दा भाजपच्या प्रचाराच्या अजेंड्यावर होता. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. कलम 370 रद्द करणे आणि महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक याचा काय संबंध असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)