गणेश घाडगे
नेवासे -नेवासे शहरातील शासकीय कार्यालयांच्या आवारातच सध्या नागरिक तोबा गर्दी करत आहेत. त्यामुळे करोना प्रतिबंधक उपाययोजना राबविणाऱ्या अधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांनाही करोनाचा विसर पडला आहे की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
देशभरात करोनाच्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. मात्र नेवासे शहरातील शासकीय कार्यालयांत होणारी गर्दी पाहून नागरिकांची करोनाची भीती गायब झाली आहे की काय, असा प्रश्न पडत आहे. सध्या शासकीय कार्यालयांच्या अवरतात अस्तव्यस्त लावलेली वाहने व नागरिकांची गर्दी असे चित्र दिसत आहे. सहायक निंबधक कार्यलय असून तालुक्यातील खरेदी विक्री साठी दररोज येथे शेकडो लोक येत असतात.
यावेळी बहुतांष नागरिकांच्या तोंडाला मास्क नसतो. तसेच खरेदीखत करण्याच्या 10 बाय 10 असलेल्या खोलीत अधिकाऱ्यासह एकाच वेळी 10 ते 15 नागरिक उपस्थित राहतात. त्यामुळे करोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे. हे कार्यालय तहसीलदार व पोलीस ठाण्याच्या मधोमध असूनही येथील गर्दीकडे दुर्लक्ष होत आहे.
नेवासे तहसील कार्यालयाच्या आवारात दुय्यम निंबधक, उपकोषागार, पुरवठा कार्यालय व पोलीस ठाणे, अशी महत्त्वाची कार्यालये आहेत. या ठिकाणी तालुक्यातील अनेक नागरिकांची विविध कामांसाठी कायमच मोठी वर्दळ असते. या ठिकाणच्या आवारात अवैद्यरित्या वाळू वाहतूक करताना पकडलेली वाहने जप्त करून लावण्यात आली आहेत. याबरोबरच तालुक्यातून कामानिमित्त येणारे नागरिक स्वतःच्या चारचाकी, दुचाकी वाहने आवारातच पार्किंग करतात. तसेच पोलिसांनी जप्त केलेली व अपघातात मोडतोड झालेली वाहने देखील याच आवारात अस्तव्यस्त पडलेले आहेत.
तसेच या वाहनांमुळे कार्यालये दिसत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचा कार्यालय शोधण्यातच वेळ जातो. तहसील आवारातील पुरवठा विभाग, कुळकायदा, रोहयो तसेच कारागृहात असलेल्या आरोपींना भेटण्यासाठी आलेले नातेवाईक यांची देखील मोठी गर्दी असते. मात्र प्रशासनाकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे. अनेकांनी याबाबत तहसीलदारांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांचेही याकडे दुर्लक्ष आहे. ही गर्दी टाळावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सामाजिक संघटनांतर्फे देण्यात आला आहे.
तहसीलच्या प्रवेशव्दारातील हॉटेलांवरच गर्दी
तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जवळपास 4 ते 5 चहाची हॉटेल असून, तेथे चहा पिण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. येथे वेटर व नागरिक करोनोच्या बाबतीत कोणतीच सुरक्षितता बाळगत नसल्याचे वास्तप चित्र पहायला मिळत आहे.