चंडिगढ – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यातील संघर्षाने बुधवारी वेगळेच वळण घेतले. मान यांचे वक्तव्य न रूचल्याने पुरोहित यांनी यापुढे पंजाब सरकारचे हेलिकॉप्टर न वापरण्याची भीष्मप्रतिज्ञाच करून टाकली. मान आणि पुरोहित यांच्यातील शाब्दिक युद्ध ही नित्याचीच बाब झाली आहे.
त्यातून मान यांनी मंगळवारी विधानसभेत पुरोहित यांच्यावर टीकास्त्र सोडले. पुरोहित माझे, राज्य सरकारचे हेलिकॉप्टर वापरतात आणि माझ्यावरच टीका करत फिरतात. त्यांनी सरकारच्या कामकाजात फार हस्तक्षेप करू नये, असे मान यांनी म्हटले. त्यावरून पुरोहित यांनी पलटवार केला.
मान यांना काय अपेक्षित आहे? मी त्यांचे कौतुक करत फिरायचे का? सीमाभागात दौरा करणे हे माझे कर्तव्यच आहे. मुख्य सचिव आणि पोलीस प्रमुखांनीही त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास केला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. जोपर्यंत मी पंजाबमध्ये आहे; तोपर्यंत राज्य सरकारचे हेलिकॉप्टर वापरणार नाही, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.