चंदीगड – कॉंग्रेसचे नेते आणि माजी खासदार पवन बन्सल हे चंदीगड येथून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र पक्षाने त्यांच्याऐवजी पक्षाचे माजी प्रवक्ते मनीष तिवारी यांना उमेदवारी दिल्यामुळे बन्सल यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. मात्र त्याच्याही पुढे जात चंदीगडच्या कॉंग्रेस अध्यक्षांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत आपल्या आनंदाचे प्रदर्शन केले आणि ते करताना बन्सल यांचा अवमान केला गेला. हाच प्रकार कॉंग्रेसच्या चंदीगड येथील पदाधिकाऱ्यांना रूचला नसून महिला अध्यक्षा दीपा दुबे यांच्यासह ३८ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. (38 office bearers of Congress in Chandigarh resigned)
दरम्यान, झाल्या प्रकाराचे गांभीर्य ओळखत कॉंग्रेसचे चंदीगड येथील प्रमुख एच. एस. लकी यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. बन्सल यांच्याबद्दल आपल्याला आदर असल्याचा दावा करताना आपले सोशल मीडिया अकाउंट सांभाळणारी वेगळी मंडळी आहेत. त्यांनी ते पोस्ट करण्याच्या अगोदर आपण पाहिले नव्हते असे लकी यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस पक्ष एक परिवार आहे आणि आम्ही सगळे त्या कुटुंबाचे सदस्य आहोत. लग्नात जशी नाराज झालेली मंडळी नंतर नाराजी सोडतात तसेच आम्ही सगळे आहोत व सगळ्यांची नाराजी दूर होईल असा दावा त्यांनी केला आहे.
लकी यांचे हे म्हणणे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पटलेले नाही. दुबे म्हणाल्या की माजी केंद्रीय मंत्री पवन बन्सल यांच्याप्रती शहरात सगळ्यांना आदर आहे. आणि त्यांचे तिकिट कापले गेल्यावर खेला हो गया अशा प्रकारची पोस्ट कोणी टाकत असेल आणि तरीही मी बन्सल यांचा आदर करतो असे म्हणत असेल तर हा कोणत्या प्रकारचा आदर आहे?
दरम्यान, बन्सल यांना सहा वेळा खासदारकी मिळाली आहे. मात्र २०१४ आणि २०१९ ची निवडणूक ते पराभूत झाले आहेत. त्यामुळे नव्या चेहऱ्याची मागणी मतदारसंघातून केली जात होती. आता मनीष तिवारी यांना उमेदवारी दिली गेली असली तरी त्यालाही पक्षातूनच पहिल्या दिवसापासून विरोध सुरू झाला आहे.