विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या सूचना
पुणे – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, प्रतिबंधीत क्षेत्रा बाबत सूक्ष्म नियोजन करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी पुणे विभागातील, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर येथील पोलीस आयुक्त , जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे संवाद साधत कोरोना स्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
नरेगा अंतर्गत ग्रामीण तसेच नगरपंचायत क्षेत्रात सोशल डिस्टन्सिंग ठेवत आवश्यकता आहे त्या ठिकाणी कामे तात्काळ सुरू करा तसेच कायदा व सुव्यवस्थेबाबत जागरूक राहणे आवश्यक असल्याचे सांगतानाच प्रतिबंधित क्षेत्राबाबत सुक्ष्म नियोजन करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.
या व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये कायदा व सुव्यवस्था, जिल्हा व महानगरपालिका स्तरावर कोरोनाबाबतच्या वैद्यकीय सुविधा, खासगी हॉस्पिटलचा सहभाग व उपलब्धता, उपलब्ध क्वारंटाईन व आयसोलेशन सुविधा, अडकून पडलेले मजूर, प्रवाशी यांची व्यवस्था, अन्नधान्य पुरवठा स्थिती, शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तींसाठी करण्यात आलेली व्यवस्था, भाजीपाला व दूध पुरवठा स्थिती, उद्योग, कारखाने स्थिती, स्वंयसेवी संस्थांचा सहभाग व त्यांच्या अडचणी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांचे अनुभव तसेच राजस्थानातील कोटा येथून परतणा-या विद्यार्थ्यांची सोय यासोबतच महत्वाचे प्रश्न व कोवीडमुळे होणारे मृत्यू आदी विषयांचा जिल्हा व सबंधित यंत्रणेकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी आवश्यक त्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी सबंधित यंत्रणेला दिल्या.
तीन दिवस कडक “लॉक’
शहरातील 10 पोलीस ठाण्यांच्याहद्दीतील परिसरात 3 मेच्या मध्यरात्री 12 पर्यंत पूर्णपणे मनाई आदेश लागू केले आहेत. या काळात या ठिकाणी सकाळी 10 ते 12 या वेळेतच दूध विक्री करता येईल. दुधाच्या वाहतुकीवर बंधने नाहीत. सकाळी 6 ते 10 या वेळेत दूध विक्री घरपोच करता येईल.
प्रतिबंधित क्षेत्र : परिमंडळ एक : समर्थ, खडक आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या अखत्यारित येत असलेला संपूर्ण परिसर.
परिमंडळ दोन : स्वारगेट पोलीस ठाणे-गुलटेकडी, महर्षीनगर, डायसप्लॉट, इंदिरानगर, खड्डा झोपडपट्टी. – लष्कर पोलीस ठाणे- नवीन मोदीखाना, भीमपुरा गल्ली, बाबाजान दर्गा, क्वाटरगेट रस्ता, शिवाजी मार्केट, सरबतवाला चौक रस्ता, बंडगार्डन पोलीस ठाणे- ताडीवाला रस्ता. – सहकारनगर पोलीस ठाणे- तळजाई वसाहत, बालाजीनगर.
परिमंडळ तीन : दत्तवाडी पोलीस ठाणे- पर्वती दर्शन परिसर.
परिमंडळ चार : येरवडा पोलीस ठाणे-लक्ष्मीनगर, गाडीतळ, चित्रा चौक परिसर. खडकी पोलीस ठाणे-पाटील इस्टेट झोपडपट्टी, इराणी वस्ती पाटकर प्लॉट.