मुंबई – पुरंदर ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या तीनही वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करून मुख्य सचिवांनी तात्काळ केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.
या प्रकरणी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनीही तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत या ईव्हीएम चोरी प्रकरणांमध्ये दोन आरोपींना अटक केली असून तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सासवड तहसील कार्यालयातून चोरीला गेलेले ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरी गेल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती.
पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासात 2 चोरांना या प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना कंट्रोल युनिट सह जेजुरीमधून अटक केली आहे. नेमकी त्यांनी ही चोरी कशासाठी केली याचा तपास सुरू आहे आणि या गुन्ह्यामध्ये या व्यतिरिक्त आणखी कोण सामील आहेत का? याबाबतचा तपास पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे.
सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवारी अशी दोन दिवस तहसील कार्यालयास सुट्टी होती.
सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडण्यात आलेलं आढळून आले. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीनमधून एक ईव्हीएम चोरीला गेल्याचे समजताच एकच खळबळ माजली होती.