पिंपरी(प्रतिनिधी) – उबेर कार चालकाला मारहाण करून मोबाइल, रोख रक्कम आणि कार पळवून नेली. याबाबतची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळताच वाकड पोलिसांनी कारचा पाठलाग करून पकडली. तसेच या गुन्ह्यातील तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या.
आकाश ऊर्फ अक्षय रामदास खरात (वय 18), सुनिल अर्जुन पवार (वय 26) आणि राहुल हिरामन लष्करे (वय 19, तिघेही रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शशिकांत महारुद्र चोबे (वय 26, रा. काटेपुरम चौक, सांगवी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सोमवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास चौबे हे ग्राहकाला घेण्यासाठी स्वर्ग लॉज, देहुरोड येथे त्यांची कार घेऊन थांबले होते. त्यावेळी चोरट्यांनी चौबे यांना मारहाण करुन त्यांची कार, मोबाइल व रोख रक्कम नऊ हजार असा एकूण पाच लाख 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून नेला.
या घटनेनंतर फिर्यादी चौबे यांनी त्वरीत पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलीस नियंत्रण कक्षाने सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत माहिती देऊन चोरून नेलेल्या कारचा तपास करण्यास सांगितले.
वाकड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रणिल चौगले, कर्मचारी तात्यासाहेब शिंदे, प्रशांत गिलबिले, बाबाजान इनामदार, कल्पेश पाटील, बारकुले यांनी आपल्या हद्दीत कारचा शोध घेण्यास सुरुवात केली. संशयित कार चिंचवडकडे येत असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार भूमकर चौक ते काळाखडक रोड दरम्यान कारचा पाठलाग केला. परंतु चोरटे कार रस्त्यावरच सोडून काळाखडक झोपडपट्टीत पळून गेले. पोलिसांनी कार ताब्यात घेऊन वाकड पोलीस ठाण्यात जमा केली. त्यानंतर पळून गेलेल्या चोरट्यांना काळाखडक झोपडपट्टीतून अटक केली.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त संजय नाईक-पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, उपनिरीक्षक प्रणिल चौगले आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.