पुणे – मौजमजेसाठी वाहने चोरणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून वाहनचोरीचे चार गुन्हे उघडकीस आले. चोरलेली 1 लाख 60 हजारांची वाहने पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
पल्सर मोटारसायकल वर तीन मुले केसनंदहून वाघोलीकडे निघालेले आहेत, अशी माहिती पोलीस नाईक कर्णवर यांना मिळाली. पाळत ठेवली असता, मोटारसायकलवरुन तीन मुले वाघोली-केसनंद चौकाकडे येताना दिसली. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला. मात्र, त्यावरील चालक वाहन वळवण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी कर्मचाऱ्यांनी पाठलाग करुन त्याला पकडले.
त्यांना पोलीस उप निरीक्षक सुरज गोरे, पोलीस अंमलदार शेडगे व कोकरे यांनी पोलीस स्टेशन येथे आणून चौकशी केली असता, मोटरसायकल चोरीची असलेचे निष्पन्न झाले. अधिक तपासात त्यांनी चंदननगर हद्दीतून एक व्हेस्पा, होंडा ऍक्टिवा, होंडा डिओ चोरल्याचे सांगितले.
ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक तटकरे, पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, निखील पवार, पोलीस उप निरीक्षक सुरज किरण गोरे यांच्या पथकाने केली.