Pune crime – शहराच्या मध्यभागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला समर्थ पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. ललित सुनील भोई-परदेशी ( २९, रा. विश्वनाथ अपार्टमेंट, पर्वती गाव ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
भवानी पेठेतील पद्मजी पार्क परिसरात ललित थांबला होता. त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याची माहिती गस्त घालणारे समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार इम्रान शेख आणि शरद घोरपडे यांना मिळाली.
पोलिसांचे पथक तेथे गेले. पोलिसांना पाहताच दुचाकी जागेवर सोडून तो पळाला. पोलिसांच्या पथकाने त्याला पाठलाग करुन पकडले. चौकशीत त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.
त्याने विश्रामबाग, सहकारनगर, वाशीम जिल्ह्यातील मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून, तसेच पर्वती परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या.
पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील, पोलीस निरीक्षक निलेश बडाख, उपनिरीक्षक सौरभ माने, सुनील रणदिवे, सहायक फौजदार संतोष पागार अंमलदार रोहिदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, रहीम शेख, ओैचरे, कल्याण बोराडे यांनी ही कारवाई केली.