पुणे – पाषाण टेकडीवर फिरायला गेलेल्या जोडप्यास मारहाण करुन लुटणाऱ्या दोघा सराईतांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. त्यांनी जोडप्याच्या बॅंक खात्यातून ऑनलाइन 76 हजारांची रक्कम वर्ग करुन घेतली होती. त्यांच्यावर मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांत लुटमारीचे तब्बल 14 गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिली.
गणेश ऊर्फ लहु रामभाऊ चव्हाण (व्यवसाय-मिस्स्त्री, रा.लोणीकंद, मूळ जिंतूर जि. परभणी) आणि राजू मंजुनाथ जगताप (रा. नसरापूर, मूळ बिरुर, जिल्हा चिकमंगळुरू, कर्नाटक) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर पुणे, जालना, नाशिक, पुणे ग्रामीण, नगर येथील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत 14 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी हे सध्या पोलीस कोठडीत आहेत.
यूपीआय आयडीद्वारे तपास
आरोपींनी जोडप्याला जबर मारहाण केली होती. यानंतर त्यांनी तरुणीचा मोबाइल फोडला, तर तरुणाचा मोबाइल फेकून दिला. पोलिसांनी तपास केल्यावर तरुणाचा मोबाइल सापडला. यूपीआय आयडी मिळाला. मात्र, बॅंका बंद असल्याने आरोपींची माहिती मिळू शकली नाही. बॅंक उघडल्यावर आरोपी गणेशच्या खात्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
पोलीस उप-आयुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त,रमेश गलांडे यांचे मार्गदशनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक,राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी, उप निरीक्षक मोहनदास जाधव, अंमलदार, सुधाकर माने,आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे, दिनेश गडाकुंश, तेजस चोपडे ,मुकुंद तारू, इरफान मोमीन, भाऊराव वारे, बाबा दांगडे, बाबुलाल तांदळे यांनी ही कामगिरी केली आहे.