कराड – येणके (ता. कराड) येथे शिवारात गुरुवारी सकाळी ऊसतोड चालू असताना उसाच्या शेतात बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. या बछड्यांना वनविभागाने सापडलेल्या ठिकाणीच एका कॅरेटमध्ये ठेवले असून आज रात्री बिबट्याच्या बछड्यांची आई आणि बछड्यांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न वनविभागाकडून करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येणके येथील मळा नावाच्या शिवारात भास्कर विठ्ठल गरुड यांचे ऊसाचे शेत आहे. या शेतात ऊसतोड सुरू असताना दुरुवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ऊसतोड मजुरांना उसाच्या शेतात बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. त्यानंतर उसतोड मजुरांनी याबाबतची माहिती शेत मालक गरुड यांना दिली.
त्यांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली. याबाबतची माहिती मिळताच तात्काळ कराडचे वनक्षेत्रपाल तुषार नवले, वन परिमंडल अधिकारी बाबुराव कदम आणि वनरक्षक राठोड यांनी घटनास्थळी भेट देवून बछड्यांची पाहणी केली. तिन्ही बछडे सुस्थितीत असून ते सुमारे 15 ते 20 दिवसांचे आहेत. बिबट्याच्या या बछड्यांना सापडलेल्या ठिकाणीच उसाच्या शेतात वनविभागाच्या निगराणीखाली एका कॅरेटमध्ये ठेवण्यात आले असून बछडे आणि त्यांच्या आईची भेट घडवण्याचा प्रयत्न वनविभागाकडून करण्यात येणार आहे.