पुणे -शहरात जानेवारी महिन्यात होणाऱ्या जी-20 परिषदेसाठी सुशोभिकरणाच्या नावाखाली महापालिकेकडून शहरात प्रत्येकी 10 ते 15 हजार रुपये भाडे मोजून 100 ते 150 ठिकाणी कृत्रिम एलईडी दिव्यांची झाडे लावली जाणार होती. मात्र, ही बाब माध्यमांतून समोर आल्यानंतर पुणेकरांनी अशा प्रकारावर होणारी उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी पुणेकरांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्याची दखल घेत आयुक्तांनी ही झाडे भाडेतत्वावर घेऊ नयेत, असे आदेश पालिकेच्या विद्युत विभागास दिले आहेत. त्यानंतर विद्युत विभागाने शहरात केवळ 10 ठिकाणी ही झाडे बसविण्याचा निर्णय घेतला असून, ही झाडेही “सीएसआर’च्या माध्यमातून बसविण्यात येणार आहेत. परिणामी महापालिकेच्या लाखो रुपयांची बचत होणार आहे.
जी-20 परिषदेसाठी महापालिकेच्या विद्युत विभागास विशेष बाब म्हणून 13 कोटींचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून 5 कोटी रुपयांची प्रकाश व्यवस्था केली जाणार होती. त्यात प्रामुख्याने या परिषदेसाठी येणाऱ्या शिष्टमंडळाच्या बैठकांच्या तसेच ते भेट देणार असलेल्या ठिकाणांच्या मार्गावर प्रकाश व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी पालिकेने सुमारे 180 एलईडी दिव्यांची सजावट असलेली कृत्रिम झाडे भाडेकराराने घेण्यात येणार होती. त्यासाठी प्रत्येक झाडाला प्रतीदिन 10 ते 15 हजार रुपये भाडे दिले जाणार होते. तर जवळपास दहा दिवस ही झाडे लावली जाणार होती. मात्र, हा खर्च केवळ उधळपट्टी ठरणार असल्याने महापालिकेच्या या निर्णयावर टीका होण्यास सुरुवात झाल्याने पालिकेने हा निर्णय मागे घेतला आहे.