कोरेगाव भीमा/ शिक्रापूर -कोरेगाव भीमा (ता. शिरूर) नजिक पेरणे फाटा येथील एक जानेवारी रोजी आयोजित विजय रणस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा, यासाठी यावर्षी अधिकच्या सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
कोरेगाव भीमा येथील अभिवादन सोहळ्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, समाज कल्याण उपायुक्त बाळासाहेब साळुंके, पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले की, विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासनातर्फे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. सोहळ्याच्या आयोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी समिती गठीत करण्यात आली आहे. अधिक व्यापक स्वरुप देण्यासाठी तसेच सुविधा निर्मितीसाठी शासनाने मंजूर केलेल्या निधीतून अल्पकालिन व दीर्घकालिन नियोजन करण्यात येत आहे.
सोहळा अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्या येईल. यावर्षी अधिक संख्येने अनुयायी येण्याची शक्यता असल्याने वाहनतळाची संख्या वाढविण्यात येणार आहे. पाण्याच्या टॅंकरची संख्या वाढविणार आहे. कर्णिक म्हणाले, कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असून आनंदाच्या वातावरणात सोहळा साजरा व्हावा यासाठी पोलीस नागरिकांशी समन्वय ठेऊन काम करेल.
5 हजार पोलीस बंदोबस्तावर
यावर्षी 150 टॅंकर, 1 हजार 500 फिरती शौचालये, पीएमपीएमएलच्या 360 बसेस, 30 रुग्णवाहिका, दुचाकी आरोग्य पथके, अग्निशमन वाहनांची व्यवस्था केली आहे. समाजबांधवांच्या आरोग्य सुविधेसाठी 140 वैद्यकीय अधिकारी कर्मचारी, 5 हजार पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.
परिसरातील खासगी रुग्णालयांना खाटा आरक्षित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस विभागाला सोहळ्यावेळी परिसरातील वाहतूक वळविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सह्याद्री वाहिनीवरून सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी दिली. यावेळी कार्यक्रमाचे नियोजन करताना विविध संघटना आणि नागरिकांच्या सूचना लक्षात घेण्यात येतील.