पालकसभेला जाताना आईवर काळाचा घाला
लोणी काळभोर- कदम-वाकवस्ती (ता. हवेली) येथील शाळेत पालक सभेस दुचाकीवरून निघालेल्या दोघी मैत्रीणींना टॅंकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मैत्रीणीचा मृत्यू झाला तर दुसरी मैत्रीण जखमी झाली आहे.
पूजा प्रकाश चव्हाण (वय 32, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली, मूळगाव- हंचीनाळ, बेळगाव), असे मृत्यू झालेल्या मैत्रीणीचे नाव आहे. त्यांची मैत्रीण शीतल सचिन शेंडगे (वय 32, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) या किरकोळ जखमी झाली आहे. हा अपघात मंगळवारी (दि. 17) सकाळी दहाच्या सुमारास झाला.
दुचाकीची भीती जीवावर बेतली
पूजा चव्हाण यांचे पती प्रकाश चव्हाण हे महावितरणच्या मुंबई येथील कार्यालयात वरिष्ठ अधिकारी आहेत. पूजा चव्हाण यांना दोन मुले आहेत. विशेष म्हणजे पूजा चव्हाण या मोटारसायकलवरून प्रवास करण्यास भीत होत्या. त्यांचाच मृत्यू दुचाकीवरून जाताना झाल्याने त्यांचे नातेवाईक हळहळ व्यक्त करीत होते. पालकसभेला जाण्यापूर्वीच पूजा यांच्यावर काळाने घाला घातल्यामुळे शोककळा पसरली आहे.
दरम्यान शीतल शेंडगे यांच्यावर कदमवाकवस्ती येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी टॅंकर चालक बालाजी सुधाकर बिराजदार (रा. शिरुर, अइनतपाळ, जि. लातूर) यास अटक केली आहे. पूजा चव्हाण व शीतल शेंडगे या दोघींची मुले कदमवाकवस्ती येथील एंजल हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. काही वर्षांपासून दोघींची मैत्री होती.
एंजलमध्ये मंगळवारी सकाळी पालक सभा असल्याने पूजा चव्हाण व शीतल शेंडगे या दोघीं दुचाकीवरून शाळेत निघाल्या होत्या. शीतल या दुचाकी चालवत होत्या. पूजा या मागे बसल्या होत्या. दुचाकीवरून दोघीजणी कवडीमाळवाडीकडून मुख्य महामार्गावर आल्या असता, त्याचवेळी शेंडगे या फोनवर बोलण्याचा प्रयत्न करू लागल्या.
दरम्यान, कवडीपाट टोलनाक्यातून बाहेर पडलेल्या डिझेलच्या टॅंकरने शेंडगे यांच्या दुचाकीला धडक दिली. यात शेंडगे डाव्या तर पूजा चव्हाण उजव्या बाजूला पडल्या. त्यावेळी टॅंकरचे पुढील चाक पूजा यांच्या अंगावरून गेले. यात पूजा गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, दोघी जखमी झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच पूजा यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.