दिवसभरात पुन्हा करोनाचा कहर; रुग्ण संख्या पोहोचली 186 वर
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज बाधितांच्या आकड्यामध्ये सातने भर पडली आहे. तर तब्बल तिघांचा एकाच दिवशी बळी गेला आहे. त्यामुळे एकूण बळींचा आकडा 12 वर पोहोचला आहे. तर बाधितांचा आकडा 186 वर पोहोचला आहे. आज मयत झालेले तिघेही शहराबाहेरील असून आज आलेल्या बाधितांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील तिघांचा तर शहराबाहेरील चारजणांचा समावेश आहे. तर आतापर्यंत एकूण 116 जण करोनामुक्त झाले आहेत.
गेल्या आठवडाभरापासून शहरातील आणि शहराबाहेरील करोना बाधितांच्या आकड्यामध्ये मोठी वाढ होत आहे. गुरुवारी 62 जणांचे अहवाल प्रतिक्षेत होते. त्यांचे अहवाल आज (शुक्रवारी) प्राप्त झाले. या अहवालानुसार एकूण सातजणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आजच्या बाधितांमध्ये शहरातील 34 आणि 45 वर्षीय दोन पुरुषांचा तर 25 वर्षीय एका तरुणीचा समावेश आहे. हे रुग्ण विकासनगर आणि रहाटणी परिसरातील आहेत. तर शहराबाहेरील बाधितांमध्ये 39 आणि 80 वर्षीय दोन पुरुषांचा तर 42 आणि 60 वर्षीय महिलांचा समावेश आहे. हे चौघेजण घोरपडीपेठ, पुणे, कामगार नगर येरवडा आणि खडकी येथील रहिवाशी आहेत.
तर आज दिवसभरात शहराबाहेरील मात्र महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तिघांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. “करोना’मुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण दगाविण्याची वायसीएममधील ही पहिलीच वेळ आहे. मयतांमधील दोघांना 12 मे रोजी एकाला 13 मे रोजी वायसीएममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
तिघांपैकी दोन मयत हे येरवडा येथील तर एकजण घोरपडी पेठ पुणे येथील रहिवाशी होता. या तिघांवर वायसीएममध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज शुक्रवारी नव्याने 67 संशयीत महापालिकेच्या वायसीएममध्ये दाखल झाले असून त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आज पाठविण्यात आलेल्या संशयितांसह एकूण 72 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. एकूण 116 रुग्णांची आतापर्यंत करोनामधून मुक्तता झाल्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 60 झाली आहे.