पुणे – शहरात शुक्रवारी नव्याने बाधित सापडलेल्या व्यक्तींपेक्षा करोनातून बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. दिवसभरात तब्बल 144 जणांना घरी सोडण्यात आले. तर गेल्या 24 तासांत 106 जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
आतापर्यंत बाधितांची संख्या 3 हजार 93 इतकी आहे. त्यातील 1 हजार 289 जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून, नायडूमध्ये 874, ससूनमध्ये 110 तर खासगी रुग्णालयांत 305 जण उपचार घेत आहे.
मागील दहा दिवसांपासून शहरात नमुने तपासणीची संख्या वाढविल्यामुळे दिवसाआड वाढत असलेली बाधितांची संख्या अधिक दिसते. मात्र, आधीच्या तुलनेत बधितांचे वाढते प्रमाण काहीसे कमी झाले आहे. 24 तासांत तब्बल 1 हजार 652 जणांचे नमुने तपासले असून, त्यामध्ये 106 पॉझिटिव्ह, तर 1 हजार 546 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ही दिलासा देणारी बाब आहे. दाखल असलेल्या बाधितांपैकी 132 जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील 33 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आल्याची माहिती पालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.
12 तासांत पाच जणांचा मृत्यू
मागील 12 तासांत पाच जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, त्यातील तीन जणांवर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात तर नोबेल आणि ससूनमध्ये प्रत्येकी एक जण उपचार घेत होता. घोरपडी पेठेतील 39 वर्षीय व्यक्ती, येरवडा येथील 80 वर्षीय व्यक्ती आणि 60 वर्षीय महिलेचा वायसीएममध्ये मृत्यू झाला. हडपसर येथील 64 वर्षीय व्यक्तीला नोबेल, तर येरवडा येथील 75 वर्षीय महिलेला ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या सर्व मृतांची अन्य आजारांची हिस्ट्री होती.