12 मीटरच्या आतील रस्त्यांचीही दुर्दशा
शिवाजीनगर बसस्थानक रस्त्याचीही “चाळण’
हडपसर, नगररस्ता, सिंहगड परिसरात प्रमाण सर्वाधिक
पुणे – सातत्याने होणाऱ्या खोदाईमुळे यंदाच्या पावसाळ्यात हडपसर, नगर रस्ता आणि सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना खड्ड्यांचा जाच सहन करावा लागत आहे. पण, नागरिकांच्या या समस्येकडे प्रशासन सातत्याने कानाडोळा करत असल्याने जीवघेणा त्रास होत आहे.
एका बाजूला शहरातील 12 मीटरपेक्षा मोठ्या रूंदीच्या रस्त्यांची चाळण झालेली असतानाच; 12 मीटरपेक्षा कमी रूंदीच्या रस्त्यांचीही जागोजागी पावसाने चाळण झाली आहे. जून आणि जुलैमध्ये महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांकडे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या रस्त्यांवर तब्बल साडेतीन हजार खड्डे पडल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. त्यात वरिल भागास सर्वाधिक खड्डे पडले आहेत.
दरम्यान, हे खड्डे दुरूस्त केल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात त्यासाठी नेमका किती खर्च आतापर्यंत करण्यात आला, याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही.
हडपसर-मुंढवा “खड्ड्यात’
शहरातील पथ विभागाच्या पाच परिमंडळ कार्यालयांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या पावसाळ्याच्या पहिल्या 2 महिन्यांत सर्वाधिक 757 खड्डे हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या ताब्यातील रस्त्यांवर आहेत. त्या पाठोपाठ 357-बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय, सिंहगड रस्ता-354, तर नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयात 344 खड्डे पडल्याची नोंद आहे. मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांसोबतच अंतर्गत भागातही प्रचंड खड्डे असल्याने त्यामुळे या भागातील नागरिकांना यंदा मनस्ताप सहन करावा लागला आहे.