राजगुरूनगर – सण असू की सुट्टीचे दिवस अथवा वीकेंड… राजगुरुनगर शहरात वाहतूक कोंडी नित्याची ठरली आहे. हीच वाहतूक कोंडी सोडवायला आता शहरातील महिला रस्त्यावर उतरल्या. अगदी रक्षाबंधनाच्या दिवशी राजगुरूनगर शहरात पुणे-नाशिक महामार्गावर पोलिसांच्या बरोबरीने महिला वर्गाने वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला. वाहतूक पोलिसांच्या मदतीला तालुका महिला दक्षता समितीतील सदस्यांनी महामार्गावर उभे राहून वाहतूक नियंत्रक स्वयंसेवकाची भूमिका बजावली.
गुरुवारी स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन एकाच दिवशी आल्याने महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आणि वाहतूक कोंडी झाली. ही कोंडी वाढल्याने अनेकांना अडकून बसावे लागले. यावेळी तालुका दक्षता व सुरक्षा समितीच्या महिला पोलिसांना राख्या बांधण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या ही बाब लक्षात आली आणि या रणरागिणीनी तेथेच ठरवले की आज आपण वाहतूक नियंत्रकाची भूमिका घ्यायची.
खेडचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका महिला दक्षता व सुरक्षा समितीच्या सदस्या मोहिनी राक्षे, सुप्रिया मुळूक, संगिता तनपुरे, सुरेखा कड, सुनंदा गायकवाड, ज्योती जाधव, अलका शिंदे, सीमा बोंबले यांनी वाहतूकनियंत्रक पोलिसांच्या मदतीने पाबळ चौक ते बाजार समिती पर्यंत वाहतूक कोंडी सोडविण्यास सुरुवात केली. यंदा प्रथमच रक्षाबंधनाच्या दिवशी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महिला रस्त्यावर उतरल्याने प्रवाशांनी त्यांचे कौतुक केले.