सोसायट्यांना अनुदानाची “लॉटरी’

क्रीडा साहित्यांसाठी 5 ते 50 हजार रुपयांपर्यंत मिळणार मदत

अनुदानासाठी पात्रता काय?

अनुदान पाहिजे असलेल्या सोसायट्यांमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध असणे आवश्‍यक आहे तसेच या खेळासाठी ज्या काही मूलभूत सुविधा पाहिजेत त्यासुद्धा उभारणे गरजेचे आहे. असे ही सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे – राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना खूश करण्यासाठी सरकारने खिसा सैल सोडला असून, या सोसायट्यांमध्ये विविध खेळांच्या सुविधा निर्मितीसाठी अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. विविध खेळांच्या प्रकारानुसार 5 ते 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान सोसायट्यांना मिळणार आहे.

राज्याच्या विविध भागांत दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण व्हाव्यात आणि त्यातून खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा व्हावी, यासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागातर्फे सार्वजनिक विश्‍वस्त संस्था, क्रीडा मंडळे व क्रीडा संघटना, व्यायाम संस्था यांना क्रीडा साहित्यासाठी अनुदान दिले जाते. खेळांच्या सुविधा निर्मितीच्या अनुदानासाठी आता गृहनिर्माण संस्थांनाही पात्र ठरविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

सहकार कायद्यांतर्गत राज्यातील गृहनिर्माण संस्थांचे कामकाज केले जात असले, तरी सरकारकडून कोणत्याही स्वरूपाची थेट मदत सोसायट्यांना आतापर्यंत केली जात नव्हती. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर संस्थांना थेट मदत करता यावी, यासाठीच क्रीडा धोरणांतर्गत हा निर्णय घेऊन, सरकारने त्याला कायदेशीर मान्यता दिली आहे.

मुंबईतील सुमारे अडीचशे सोसायट्यांना त्यासाठीचे अनुदान मंजूर करून त्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली आहे. बॅडमिंटन, फुटबॉल, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, ओपन जिम, क्रिकेट, सायकल आणि योगाचे साहित्य खरेदीसाठी हे अनुदान मिळेल, असे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.