मुंबई – ऑनलाईन गेमिंगमधील गुंतवणुकीच्या संदर्भात खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या पाच तरुणांना 6 महिने वृद्धाश्रमात जाऊन सेवा करण्याची अनोखी शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने सुनावली आहे. याप्रकरणी दाखल फौजदारी खटल्यामुळे नोकरी मिळण्यास अडचणी येत असल्यामुळे, हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी या तरूणांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. अनिल किल्लोर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. हे प्रकरण तक्रारदाराच्या सहमतीने परस्पर मिटविण्यात आले असून दाखल झालेला गुन्हा रद्द झाल्यास तक्रारदारालाही हरकत नाही, असेही पोलिसांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. मात्र दाखल गुन्हा रद्द करताना केलेल्या गुन्ह्याची अद्दल घडावी, म्हणून न्यायालयाने पाचही आरोपींना पुढचे सहा महिने पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत पुण्यातील ‘निवारा’ वृद्धाश्रमात काम करण्याची शिक्षा सुनावली.
तसेच सहा महिन्यांनी तिथे काम केल्याचे प्रमाणपत्र न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. तसेच या पाच जणांनी ऑनलाइन गेमिंगमधील मोठ्या नफ्याच्या हव्यासापोटी पैसे पुरविणाऱ्या तक्रारदार मित्रालाही त्यांच्यासोबत तिथे सेवा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणी 6 एप्रिल 2021 रोजी पुण्यातील वानवडी पोलीस स्थानकांत आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी पाच आरोपींविरोधात आयपीसी कलम 365, 384, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता.