आजच्या तरुणपिढीवर ज्याच्या आवाजाने अक्षरशः मोहिनी घातली आहे तो अरजित सिंग सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. हे कारण पैशांशी जोडलेले आहे. आता तुम्ही म्हणाल की त्याच्या मानधनाविषयी आहे का? असले तर घेऊ देत की ! पण वाचकहो, हा मामला आहे फ्लॅटचा. तोही एक नव्हे चार फ्लॅटचा.
त्याचे झाले असे की, अरजितने मुंबईतील वर्सोवामध्ये चार फ्लॅट खरेदी केले आहेत. वर्सोवा हा मुंबईतील एक पॉश भाग म्हणून ओळखला जातो. अरजितच्या पहिल्या फ्लॅटची किंमत 1.80 कोटी इतकी सांगितली जात असून तो सहाव्या मजल्यावर आहे. याच फ्लोअरवर अरजितने अन्य तीन फ्लॅट घेतले आहेत.
त्यांची किंमत 2.20 कोटी, 2.60 कोटी आणि 2.50 कोटी इतकी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे एकूण 9.1 कोटी रुपयांत अरजितने हे चार फ्लॅट खरेदी केले आहेत. 2005 मध्ये अरजितने आपल्या संगीत करिअरची सुरुवात केली होती. “फेम गुरुकुल’ या रिऍलिटी शोमधून तो झळकला होता. या शोदरम्यानच संजय लीला भन्साळींची नजर त्याच्यावर पडली.