श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांनी महत्वपूर्ण कारवाई करताना पाच दहशतवाद्यांना अटक केली. त्यामुळे इस्लामिक स्टेट जम्मू-काश्मीर (आयएसजेके) या दहशतवादी संघटनेचे जाळे उघडकीस आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बडगाम जिल्ह्यात संबंधित कारवाई केली.
पकडलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा साठा जप्त करण्यात आला. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या खतरनाक दहशतवादी संघटनेमुळे आकर्षित होऊन आयएसजेकेच्या नावाने काही देशविरोधी घटक सक्रिय झाले असल्याचे समजते.
मात्र, पोलिसांची धडक कारवाई त्या संघटनेसाठी मोठा हादरा मानली जात आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून आयएसजेकेच्या नापाक मनसुब्यांवर प्रकाश पडण्याची शक्यता आहे. सुरक्षा दलांकडून सातत्याने राबवल्या जाणाऱ्या मोहिमांमुळे जम्मू-काश्मीरात दहशतवादी संघटनांना जबर तडाखा बसत आहे.