तळेगाव दाभाडे – नगरपरिषद हद्दीत ठिकठिकाणी खोदलेले खड्डे, उघड्या गटारी नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळवारी (दि. 11) सकाळी तळेगाव मधील भेगडे तालीम रस्त्याजवळ खोदलेल्या व पाण्याने भरलेला खड्ड्यात एक लहान मुलगी खेळताना पडली.
रोट्रॅक्ट क्लबचे केशव मोहोळ आणि आकाश गाडे पाटील तळेगाव मधील भेगडे तालीमपासून पुढे जात असताना एक छोटी मुलगी रस्त्याच्या बाजूला संबंधित कामासाठी खोदलेल्या (नालासदृश्य) गटारीमध्ये बुडत असताना त्यांनी पाहिले. प्रसंगावधान दाखवत तिला तिच्या आईच्या मदतीने त्या चिमुरडीला नाल्यातून बाहेर काढण्यात आले.
तळेगाव शहराच्या परिसरात खोदलेल्या या खड्ड्यांत पाणी साचले आहे. जवळच लोकवस्ती असल्याने लहान मुले खेळताना पडून दुर्दैवी घटना घडू शकते. यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.