पिंपरी – दुचाकी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून 2 लाख 21 हजार रुपये किंमतीच्या तब्बल 11 दुचाक्या जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील सहा, हिंजवडी पोलीस ठाण्यातील दोन, भोसरी एमआयडीसी, देहूरोड, तळेगाव पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे 11 गुन्हे उघडकीस आले आहेत.
राहुल अंकुश क्षीरसागर (वय 19, रा. कामशेत) आणि अक्षय दशरथ शिंदे (वय 20, रा. चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्यातील टीम क्रमांक 15 आणि 16 वाकड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी, डांगे चौकातून थेरगावच्या बाजूला एका दुचाकीवर दोघेजण संशयितरीत्या फिरताना आढळून आले. त्यावरून 15 नंबर टीमने 16 नंबर टीमला माहिती दिल्यानंतर 16 नंबर टीमने त्यांना थेरगाव येथे पकडले. सुरुवातीला त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच दोघेजण वापरत असलेली दुचाकी चोरीची असून तिचा नंबर बदलून ती वापरत असल्याचे सांगितले. यावर त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मौजमजेसाठी शहर परिसरातून तब्बल 11 दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले.
पोलिसांनी 2 लाख 21 हजार रुपये किमतीच्या 11 दुचाक्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, साहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) ज्ञानेश्वर साबळे, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, विकास मडके, पोलीस कर्मचारी अनिल महाजन, रजनीकांत कोळी, सुनील काटे, सेलूकर, सनी गोंधळे, विशाल ओव्हाळ, जावेद मुजावर, बापूसाहेब धुमाळ, नितीन ढोरजे, दीपक भोसले, विक्रम जगदाळे, विजय गंभीरे, नितीन गेंगजे, सुरज सुतार यांच्या पथकाने केली.