जागेच्या वादात अडकला बेबड ओहोळचा नवापूल

जुना धोकादायक पूल पाचवीला : चाळीस गावांचे दळणवळण अधांतरी

सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता राकेश सोनवणे म्हणाले की, दोन कोटी 70 लाख रुपयांच्या निधीतून सन 2015 पासून कामाला सुरुवात केली. लांबी 105 मीटर व रुंदी साडेसात मीटर आहे. मात्र पुलाचा काही भाग सुमन सांडभोर यांच्या मालकीहक्‍कामध्ये जातो. यासंदर्भात सांडभोर यांच्यासोबत चर्चा सुरू असून, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जागेचा प्रश्‍न सोडविण्याची तडजोड सुरू आहेत. जागेचा प्रश्‍न सुटल्यावर काही दिवसांतच या पुलावरून वाहतूक सुरू होईल.

वडगाव मावळ – पवन मावळातील 40 गावांच्या दळण-वळणाच्या मार्गावरील पवना नदीवरील बेबड ओहोळ पुलाचे काम 10 वर्षांपासून रखडले आहे. या पुलाचे काम पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पूर्वीचा जुना पूल धोकादायक झाला असून, त्या पुलाखाली लोखंडी पाइप उभारले आहेत. केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यामुळेच खासगी जागेत नव्या पुलाचे बांधकाम गेले. त्यामुळे संबंधित मालकाने न्यायलयात धाव घेतली. नागरिकांना धोकादायक पुलावरून प्रवास करावा लागत आहे.

पवना नदीवरील बेबडओहोळ पुलावरून औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहतूक 24 तास सुरू असते. या पुलावरून अवजड वाहने ये-जा करताना पुलाची वाळू गळत असते. तर अनेक ठिकाणी काही भाग खचला आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होत असल्याने 40 गावांचा संपर्क तुटतो. या पुलावरून विद्यार्थी, कामगार, दुग्धव्यावसायिक, शेतकरी व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.

जुन्या पुलाला जागोजागी लोखंडी पाईप उभारले आहेत. जीव मुठीत धरून त्या धोकादायक पुलावरून ये-जा करताना त्या नव्या पुलाचे बांधकाम 95 टक्‍के पूर्ण झाले आहे. सुमन सांडभोर यांच्या मालकीच्या जागेत पुलाचा काही भाग गेल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात या पुलाच्या जागेविषयी प्रकरण आहे. केवळ अभियंत्यामुळेच या पुलाचे काम रखडल्याने वाहनचालक व ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.

माजी आमदार दिंगबर भेगडे यांच्या काळात या पुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले. आता मावळात राज्यमंत्रीपद असल्याने या पुलाचा प्रश्‍न सुटण्याची आशा वाहनचालक व ग्रामस्थ व्यक्‍त करीत आहेत. नव्याने उभारलेला पूल केवळ वादात अडकल्याने वाहन चालक व ग्रामस्थ त्रस्त आहेत. तसेच धोकादायक पुलाचा विचार करता, नव्या पुलावरून त्वरित वाहतूक सुरू करण्याची मागणी स्थानिक रहिवाशी विठ्ठल घारे, बाबुराव घारे, शांताराम घारे, मारुती घारे, भाऊसाहेब घारे व
ग्रामस्थांनी केली.

बेबड ओहोळ पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. अभियंत्याने योग्य जागेवर पूल केला असता वाहतुकीसाठी तेव्हाच पूल खुला झाला असता. नव्याने पुलाचे 95 टक्‍के काम पूर्ण असून, केवळ खासगी जागेत पुलाचे अतिक्रमण झाल्याने पूल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. धोकादायक पुलावरून अवजड व अन्य वाहतूक सुरू आहे. भविष्यात दुर्घटना झाल्यावर प्रशासन जबाबदार राहील.

– किरण घारे, ग्रामस्थ, बेबड ओहोळ.

Leave A Reply

Your email address will not be published.