मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारी 30 ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानी यांना मेलद्वारे धमकी दिली आहे. यावेळी त्यांच्याकडे 400 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. या पूर्वी सलग दोनदा त्यांना या पद्धतीची धमकी अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली होती. सततच्या धमक्यांनंतर मुकेश अंबानींच्या राहत्या अँटिलिया निवास स्थानाभोवती सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.
यापूर्वी 27 ऑक्टोबर रोजी मेलद्वारे 20 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा 200 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा देण्यात आलेल्या धमकीच्या मेलमध्ये 400 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. पोलीस तपासात हा मेल आयडी शादाब खान नावाच्या व्यक्तीचा असून हा मेल बेल्जियममधून आल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
त्यासोबतच बेल्जियमच्या मेल प्रोव्हायडर कंपनीशीही संपर्क साधून त्यांच्याकडून या मेल आयडीची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. अज्ञात आणि ई-मेल आयडी एकच आहे, तथापि पूर्वीच्या ई-मेलच्या तुलनेत खंडणीची रक्कम वाढवण्यात आली आहे. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहेत.
सोमवारी पाठवलेल्या तिसऱ्या ईमेलमध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीने लिहिले आहे की, “तुमची सुरक्षा कितीही मजबूत असली तरी आमचा एक स्नायपर तुम्हाला मारू शकतो. यावेळी 400 कोटी रुपयांची मागणी आहे. पोलीस माझा माग काढू शकत नाहीत किंवा मला अटक करू शकत नाहीत.” अंबानींना यापूर्वीही धमक्या आल्या आहेत. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील त्यांना अनेकदा धमकी देण्यात आली आहे.