Billionaires in India: भारतातील अब्जाधीशांची एकूण संख्या 271 झाली आहे. सन 2023 मध्ये देशातील अब्जाधीशांच्या संख्येत 94 ने वाढ झाली आहे. या सर्व अब्जाधीशांची एकूण संपत्ती जोडली तर ती सुमारे 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचते तर पाकिस्तानचा संपूर्ण जीडीपी 1.57 ट्रिलियन डॉलर आहे. (271 billionaires in india mukesh ambani is on top)
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे 2024 च्या हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये जगातील टॉप 10 अब्जाधीशांमध्ये स्थान मिळवणारे एकमेव भारतीय आहेत.
मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती –
अहवालानुसार, 66 वर्षीय अंबानींची एकूण संपत्ती 40 टक्क्यांनी वाढून 115 अब्ज डॉलर झाली आहे. मात्र, संपत्तीत वाढ होऊनही मुकेश अंबानी जगातील अव्वल अब्जाधीशांच्या क्रमवारीत एका स्थानाने घसरून 10व्या स्थानावर पोहोचले आहेत. मात्र आशियातील ते सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
गौतम अदानी 15व्या स्थानावर –
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 15 व्या क्रमांकावर असून अब्जाधीशांच्या यादीत ते अंबानी यांच्यानंतरचे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत.
61 वर्षीय गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 86 अब्ज डॉलर्स आहे. अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे त्यांच्या संपत्तीत 33 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.
शेअर बाजारामुळे भारतात 94 नवीन अब्जाधीशांची भर पडली –
यावर्षी भारतात 94 नवीन अब्जाधीशांची भर पडली आहे, यावर्षी शेअर बाजार तेजीत राहीला त्यामुळे ही संख्या वाढली आहे.
याशिवाय प्रमुख भारतीय उद्योगांमध्ये फार्मास्युटिकल्स (39 अब्जाधीश), ऑटोमोबाईल आणि ऑटो घटक (27) आणि रसायने (24) जणांचा समावेश आहे. अहवालानुसार अब्जाधीशांचे सरासरी वय 67 वर्षे आहे.
सर्वाधिक अब्जाधीश मुंबईत राहतात –
मुंबई ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अब्जाधीशांची राजधानी म्हणून उदयास आली आहे. अहवालानुसार, 2023 मध्ये मुंबईत 26 नवीन अब्जाधीशांची भर पडली आहे. यासह सर्वाधिक अब्जाधीश राहत असलेल्या शहरांच्या यादीत मुंबई तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
महाराष्ट्राची राजधानी आशियातील अब्जाधीशांची राजधानी आहे. अब्जाधीशांच्या संख्येच्या बाबतीत नवी दिल्ली प्रथमच पहिल्या दहामध्ये पोहोचली आहे. पाम बीच, इस्तंबूल, मेक्सिको सिटी आणि मेलबर्न देखील हुरुनच्या शीर्ष 30 शहरांमध्ये समाविष्ट आहेत.
चीनची राजधानी बीजिंगला मागे टाकत मुंबईने प्रथमच हे स्थान मिळवले आहे. येथे 603 चौरस किलोमीटर परिसरात 92 अब्जाधीश राहतात, तर बीजिंगच्या 16,000 चौरस किलोमीटर परिसरात 91 अब्जाधीश आहेत. चीनमध्ये 814 अब्जाधीश आहेत, तर भारतात 271 अब्जाधीश आहेत.
जागतिक स्तरावर या यादीत मुंबई आता तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. न्यूयॉर्क पहिल्या स्थानावर आहे, येथे 119 अब्जाधीश राहतात, तर लंडन दुसऱ्या स्थानावर आहे, जिथे 97 लोक अब्जाधीश आहेत. अब्जाधीश म्हणजे ते लोक ज्यांची संपत्ती 8,333 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
92 लोकांकडे 445 अब्ज डॉलर्सची संपत्ती –
अहवालानुसार, मुंबईतील एकूण 92 लोकांची संपत्ती एका वर्षात 47 टक्क्यांनी वाढून 445 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्याच वेळी, चीनच्या राजधानीतील अब्जाधीशांची संपत्ती 28% कमी होऊन $265 अब्ज झाली आहे.
शहर – अब्जाधीशांची संख्या
न्यूयॉर्क – 119
लंडन – 97
मुंबई – 92
बीजिंग – 91
संघाई – 87
शेन्झेन -84
हाँगकाँग – 65