Mahua Moitra : संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा भाजपा नेत्यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप केला. यानंतर राष्ट्रीय स्तरावर मोठा वाद निर्माण झाला. महुआ मोईत्रा यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सगळे आरोप फेटाळून लावले. तसेच आरोप कुणीही करु शकतो. मात्र ते सिद्ध करण्याची जबाबदारी आणि त्याचे पुरावे देण्याची जबाबदारी ही आरोप करणाऱ्याची किंवा तक्रार करणाऱ्याची असते, असेहे त्यांनी यावेळी म्हटले होते. आता मोईत्रा यांनी एका पत्रकाराबरोबर व्हॉट्सअपवर झालेल्या चर्चेचा स्क्रिनशॉट शेअर करत खोचक टोला लगावला आहे.
महुआ मोईत्रा यांनी ट्विटरवर एका चॅटचा व्हॉट्सअप स्क्रिनशॉट शेअर केला आहे. त्यात त्यांनी, “गोदी मीडियाला मुलाखत देण्यासाठी मी माझी किंमत सांगत आहे.” असे म्हणत खोचक टोला लगावला आहे.
एका चॅनलच्या पत्रकाराने महुआ मोईत्रा यांना त्यांच्या मुलाखतीसाठी विचारणा केली. यावर महुआ मोईत्रा यांनी हसत खोचकपणे टीका करत उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, “तुम्ही सध्या तुमच्या चॅनलवर माझ्या नावाने जो हिरे आणि पाचूचा हार दाखवत आहात. तो हार हीच माझ्या मुलाखतीची किंमत आहे. तुमच्या बॉसला जाऊन शब्दशः हे सांगा.” असे व्हॉट्सअप चॅटमध्ये त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महुआ मोईत्रा या आरोपांवर म्हणाल्या होत्या, “मी जर प्रश्न उपस्थित करण्याच्या बदल्यात पैसे घेतले होते तर हे कुठल्या तारखेला घडलं होतं जरा ती तारीखही मला सांगा. तसंच मी पैसे घेतले आहेत याचे पुरावेही सादर करा.” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.