‘त्यांनी’ धाडस दाखवावं आणि निवडक संवादाऐवजी पूर्ण ऑडिओ शेअर करावा; प्रशांत किशोर यांच्याकडून चॅलेंज

नवी दिल्ली : देशात पाच राज्यात होत असलेल्या निवडणुकींपैकी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीने एकच रंगत आली आहे. पश्चिम बंगाल नेमका कुणाला कौल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांची ऑडिओ क्लिप भाजपाच्या आयटी सेलकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपा जिंकत असल्याचे किशोर यांनी मान्य केल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आल्यानंतर प्रशांत किशोरी यांनी हे सगळं खोटं असल्याचे सांगत भाजपाला आव्हान दिले आहे.

भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी क्लब हाऊस अॅपवरील चर्चेचा एक व्हिडीओ ट्विट करून बंगालमध्ये भाजपा जिंकत असल्याचा दावा केला.मालवीय यांनी एका पाठोपाठ एक असे ट्विट करून काही ऑडिओ क्लिप पोस्ट केल्या आहेत. क्लब हाऊन अॅपवर सुरू असलेल्या चर्चेच्या या ऑडिओ क्लिप असून, याच ममतांचे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर काही पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत.

ऑडिओ क्लिपमध्ये प्रशांत किशोर हे मोदींच्या नावावर मत पडत असल्याचे, हिंदूंच्या नावावर मत पडत असल्याचे म्हणताना ऐकालयला येत आहे. प्रशांत किशोर यांच्या ऑडिओ क्लिपच्या हवाल्याने आता भाजपाकडून दावा केला जात आहे की, ममता बॅनर्जी यांनी पराभव स्वीकारला आहे. भाजपाच्या आयटी सेलकडून जारी करण्यात आलेल्या ऑडिओ क्लिपवरून प्रशांत किशोर यांनी भाजपावर टीका केली आहे.

“हे बघून मला जाणून आनंद झाला की, भाजपा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपेक्षा आपल्या बोलण्याला जास्त गंभीरपणे घेतात. त्यांनी धाडस दाखवावं आणि निवडक संवादाऐवजी पूर्ण ऑडिओ शेअर करावा. मी यापूर्वीही बोललो आहे आणि पुन्हा बोलतोय पश्चिम बंगालमध्ये भाजपा १०० जागांच्या पलिकडे जाणार नाही,” असं प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. क्लब हाऊस एक अॅप असून, ऑडिओ स्वरूपातील कॉन्फरन्स घेण्यासाठी वापरलं जातं. याच ऑडिओ कॉन्फरन्सची व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आलेली असून, तेच व्हिडीओ अमित मालवीय यांनी ट्विट केले आहेत. या पत्रकार परिषदेत प्रशांत किशोर यांच्याबरोबर अनेक पत्रकार सहभागी झालेले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.