पिंपरी मर्चंट फेडरेशनचा इशारा; प्रसंगी कुटुंबासह रस्त्यावर उतरू
श्रीचंद आसवानी यांचा प्रशासनाला इशारा
पिंपरी – अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने बंद करण्यास पिंपरी मर्चंट फेडरेशनचा तीव्र विरोध आहे. याबाबत तोडगा न निघाल्यास सोमवारपासून (दि. 12) दुकाने खुली करण्यात येतील, अशी भूमिका फेडरेशनतर्फे घेण्यात आली आहे. त्यासाठी वेळ प्रसंगी कुटुंबासह आंदोलनासाठी रस्त्यावर उतरू, असे फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी स्पष्ट केले.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केल्यानंतर दि. 7 ते 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरात व्यापाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. आता पुन्हा लॉकडाऊन केल्यामुळे निर्माण होणारे प्रश्न कसे सोडवायचे, याबाबतचा गुंता वाढला आहे.
पिंपरी येथील शगुन चौकात त्याबाबत एक फलक लावून व्यापाऱ्यांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. “नो मोअर लॉकडाऊन प्लीज’ अशा आशयाचा हा फलक असून आम्ही दुकान भाडे, वीज बिल, बॅंकांचे हप्ते, कामगारांचे पगार, महापालिकेचा मिळकत कर, घरखर्च, मुलांचे शैक्षणिक शुल्क कसे भागवायचे, असा प्रश्न त्यामध्ये उपस्थित केला आहे.
व्यापारी प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यास बांधिल आहे. महापालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. याबाबत तोडगा न निघाल्यास आम्ही सोमवारपासून दुकाने खुली करणार आहोत. वेळ प्रसंगी कुटुंबासह आंदोलनासाठी रस्त्यावर उतरू.
– श्रीचंद आसवानी, अध्यक्ष, पिंपरी मर्चंट फेडरेशन.
दुकाने खुली करण्यास परवानगी मिळावी, ही व्यापाऱ्यांची रास्त मागणी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे यातून काही तरी सकारात्मक मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे. अर्थचक्र बंद करून चालणार नाही. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुकानदार व ग्राहकांनी सरकारच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
– गजानन बाबर, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवड