हैदराबाद – भारतात करोना विरोधी लसीकरणाची मोहीम सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून तयार केली जात असलेली कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या स्वदेशी कोव्हॅक्सिनला आपत्कालीन मंजुरी देण्यात आली आहे. लस देण्याचा पहिला टप्पा 16 जानेवारी रोजी सुरूही झाला आहे. त्याचदरम्यान, आता भारत बायोटेकने आणि सीरम इन्स्टिट्यूटने एक फॅक्टशीट जारी करत कोणी आपली लस घेऊ नये याच्या सूचना दिल्या आहेत.
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी लस घेउ नये असे आवाहन त्यांनी केले आहे. ज्यांना कोणत्याही प्रकारची ऍलर्जी आहे, ताप आहे किंवा कोणत्या प्रकारचा रक्तस्त्राव होत असेल तर अशा लोकांनीही लस घेऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. ज्यांना कोणता गंभीर आजार आहे अशा व्यक्तींनाही लस ने घेण्याचे सांगण्यात आले आहे.
आपल्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या फॅक्टशीटमध्ये भारत बायोटेकने म्हटले आहे की, लसीची चाचणी अद्याप तीसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे तिच्या परिणामकारकतेची पडताळणी अद्याप झालेली नाही. या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलच्या आकडेवारीची अद्याप पडताळणी सुरू आहे. दरम्यान, आपण लस घेतली म्हणजे आता कोणतीही काळजी घेतली नाही तरी चालेल असे कोणी समजू नये असेही कंपनीने म्हटले आहे.
लस घेण्यापूर्वी लस देणाऱ्याला आपली संपूर्ण माहिती दिली जावी. त्यात आपला वैद्यकीय इतिहास सांगितला जावा. चार आठवड्यांच्या कालावधीत दिल्या गेलेल्या दोन डोसनंतर शरीरात अँटीबॉडी तयार होतात असे आढळून आले असल्याचेही कंपनीने नमूद केले.
सीरमचेही फॅक्टशीट
दरम्यान, सीरमनेही फॅक्टशीट जारी करत कोणी लस घेऊ नये याचा सल्ला दिला आहे. ज्यांना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ऍलर्जीक रिऍक्शन झाली आहे त्यांनी दुसरा डोस घेऊ नये असे सांगण्यात आले आहे. तसेच या लसीत असलेल्या घटकांची ज्यांना ऍलर्जी आहे त्यांनी लस घेऊ नये असे सांगण्यात आले आहे.
एल- हिस्टिडाइन, एल-हिस्टिडाइन हायड्रोक्लोराइड मोनोहायड्रेट, मॅग्नेशीयम क्लोराइड हेक्झाहायड्रेट, पॉलीसॉरबेट 80, इथेनॉल, सुक्रोस, सोडीयम क्लोराइड आदी लसीतले घटक आहेत. कोणते औषध घेतल्यानंतर अथवा काही खाल्ल्यानंतर आपल्याला तीव्र स्वरूपाची ऍलर्जी झाली आहे का, हेही लस घेण्यापूर्वी लस देणाऱ्याला सांगितले जावे असे सीरमने म्हटले आहे.