पायउतार झाल्यानंतर ट्रम्प यांना अटक होण्याची शक्‍यता

वॉशिंग्टन – अमेरिकेचे वादग्रस्त अध्यक्ष उद्या आपल्या अध्यक्षपदावरून पायउतार होंत असून त्यानंतर त्यांना लगेच अटक होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर राजधानीत हिंसाचार माजवण्याच्या आरोपाखाली ही कारवाई होऊ शकते असे सांगितले जात आहे.

त्यांनी 6 जानेवारीला एक भाषण करून आपल्या समर्थकांना हल्ला करण्याची उघड चिथावणी दिली होती, त्या आधारावर त्यांच्यावर ही कारवाई होऊ शकते असे सांगितले जात आहे. तसेच त्यांच्या विरोधात सिनेट मध्ये जो एक प्रस्ताव प्रलंबीत आहे तो संमत झाला तर त्यांना निवडणुक लढवण्यासही कायमची बंदी घातली जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

दंगलीला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपांखेरीज त्यांच्या विरोधात निवडणूक भ्रष्टाचाराच्या अनुषंगानेही कारवाईची मागणी करणाऱ्या अनेक याचिका कोर्टात प्रलंबीत आहेत. त्यावरूनही ते अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. अमेरिकेचे बहुतेक निवृत्त अध्यक्ष आपला बराच वेळ गोल्फ खेळण्यात, किंवा आपल्या वाचनालयात पुस्तके वाचण्यात आणि बीच रिसॉर्टवर आराम करण्यात आपले आयुष्य व्यतित करतात.

पण ट्रम्प यांना मात्र आपल्या निवृत्त आयुष्यात कारावासासह अन्य अनेक अवमानकारक कारवायांचा सामना करावा लागण्याची एकूणात चिन्ह आहेत. दरम्यान उद्याच्या बायडेन यांच्या शपथग्रण सोहोळ्याला ते उपस्थित राहण्याची शक्‍यता नाही असेही सांगण्यात येत आहे.

असे झाले तर नवीन अध्यक्षांच्या शपथविधीला मावळते अध्यक्ष हजर न राहण्याचा प्रसंग 1869 नंतर प्रथमच उद्‌भवणार आहे. त्या साली अँड्रु जॉनसन यांनी नवीन अध्यक्षांच्या शपथविधीला हजर राहणे टाळले असते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.