कृषी कायद्यांसंदर्भातील समितीच्या बैठकीत ‘या’ विषयावर चर्चा

नवी दिल्ली, दि. 19 – अलिकडेच मंजूर करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांबाबत संबंधित हितधारकांशी विचार-विनिमय करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दि.12 जानेवारीला नियुक्त केलेल्या समितीची पहिली बैठक आज झाली. कृषी खर्च व किंमती आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक गुलाटी, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट आणि आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्था , दक्षिण आशियाचे माजी संचालक डॉ. प्रमोद जोशी यांनी या बैठकीत भाग घेतला आणि समितीच्या शिफारशी तयार करण्यासाठी आगामी दोन महिन्यात शेतकरी, शेतकरी संघटना आणि इतर हितधारकांशी चर्चा करण्यासाठी समितीच्या कामकाजाबाबतच्या रुपरेषेवर चर्चा केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही समिती जे शेती कायद्याच्या बाजूने आणि विरोधात आहेत अशा सर्व शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या संस्थांशी चर्चा करेल, असे अनिल घनवट माध्यमांना संबोधित करताना म्हणाले.

ही समिती राज्य सरकारे, राज्य विपणन मंडळ आणि शेतकरी उत्पादक संघटना आणि सहकारी संस्था सारख्या संबंधित इतर घटकांशी चर्चा करणार आहे. लवकरच शेतकरी संघटना व संस्थांना कृषी कायद्यांविषयी त्यांच्या मतांबद्दल चर्चा करण्यासाठी आमंत्रण पाठवेल. प्रत्येक शेतकरी पोर्टलवर आपली वैयक्तिक सूचना सादर करू शकतो.

समिती या विषयांशी संबंधित सर्वांचे मत जाणून घेण्यास उत्सुक आहे. तसेच ते अशा शिफारशी सुचवतील ज्या भारतातील शेतकऱ्यांच्या हिताच्या असतील, असेही घनवट यांनी म्हटले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.