नगर -तपोवन रस्त्याचे काम निकृष्ट असल्याची पहिली तक्रार विरोधी पक्षनेता म्हणून मीच केली. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रभाग एक, दोन व सातमधील अन्य नगरसेवकांचीही तीच भूमिका होती. ठेकेदाराचे बिल अडविण्याची पहिली मागणीही आम्हीच केली. मात्र, त्या संदर्भातील छापून आलेल्या बातम्या “त्यांच्या’ वाचनात आल्या नसाव्यात.
कारण बहुतेक वेळा “ते’ शुद्धीत नसतात. त्यामुळे असे होऊ शकते, असा पलटवार महापालिका विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आज केला. बहुचर्चित तपोवन रस्त्याच्या कथित निकृष्ट कामावरुन गेल्या काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
त्यात काल माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांवर आरोप करताना “त्यांना’ ठेकेदाराचे बिल अडविल्याचे दु:ख झाले असावे, अशी परखड भूमिका त्यांनी मांडली. आज विरोधी पक्षनेते बारस्कर यांनी दैनिक प्रभातशी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची परखड भूमिका मांडली.
विरोधी पक्षनेते बारस्कर म्हणाले, “”तपोवन रस्त्याच्या कामाची प्रस्तावित रक्कम किती, त्याची सुध्दा त्यांना स्पष्ट कल्पना नाही. रस्त्याचे काम कधी सुरु झाले, हे देखील त्यांना माहित नाही. रस्त्याच्या कामाला सुरुवातीपासून खूप विरोध केला. त्यामुळे सुरुवातीपासून त्यांना रस्त्याचे श्रेय घेताच आले नाही.
दरम्यान, तपोवन रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरु झाल्यापासून किमान आठ वेळा कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी ते बंद पाडले होते. त्यानंतरही कामात सुधारणा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांना काळे फासण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला. त्याच्या बातम्या बहुतेक वर्तमानपत्रांमधून छापून देखील आल्या. तथापि, त्या वेळी कथित नेते कदाचित नेहमीप्रमाणे शुद्धीत नसावेत.
त्यामुळे आंदोलनाच्या बातम्या त्यांनी वाचल्याच नसाव्यात. म्हणून रस्त्याचे काम व ठेकेदाराचे बिल कोणी अडविले, याचीच माहिती नाही.” तपोवन रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून, त्याचे तत्काळ सर्वेक्षण व्हावे, अशी मागणी आम्हीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती.
त्याचसदंर्भात आमदार संग्राम जगताप यांनी देखील चौकशी होण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आग्रह धरला. त्यावरुनच तातडीने ही चौकशी झाली. आता त्याचेही श्रेय मिळणार नसल्याने उगाच कल्ला करुन गल्ला भरण्याचा उद्योग त्यांच्याकडून सुरु आहे, अशी भूमिकाही बारस्कर यांनी स्पष्ट केली.
“त्यांचे’ कॉल डिटेल्स तपासा…!
तपोवन रस्त्याच्या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडे काम करणाऱ्यांना आजवर कोणी-कोणी फोन केले, त्याची माहिती आम्ही मिळविली आहे. कामाची तपासणी सुरु असतानाच ठेकेदाराकडील एकाने उपस्थित नेत्याकडे पाहून “मला बोलायला भाग पाडू नका’ असा शाब्दीक इशाराही दिला.
त्यामुळे आता “गल्ला’ भरुन घेण्यासाठी कोणी दबाव आणला, याचीही चौकशी करण्याची गरत आहे. त्यासाठी “त्यांचे’ कॉल डिटेल्स तपासावेत, असे बारस्कर म्हणाले.