अधिकाऱ्यांवर कारवाईची शिक्षक सेनेची मागणी
पुणे – महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) इयत्ता आठवीच्या मराठी भाषा विषयाच्या पाठ्यपुस्तकातील एका धड्यातून थोर क्रांतिकारक सुखदेव यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी कुर्बान हुसेन यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे सुखेदव यांचा अपमान करण्यात आला असून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व पुस्तकातील चूक दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघ व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेकडून बालभारतीकडे करण्यात आली आहे.
शालेय वर्ष सन 2018-19 मध्ये इयत्ता आठवीसाठी मराठी बालभारती हे पाठ्यपुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकात “माझे देशावर प्रेम आहे’ हा पाठ क्रमांक दोन समाविष्ट करण्यात आलेला आहे. नामवंत लेखक यदुनाथ थत्ते यांच्या “प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील’ या पुस्तकातून हा पाठ घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये शालेय पाठ्यपुस्तकामधील देण्यात आलेल्या प्रतिज्ञेच्या “माझ्या देशावर माझे प्रेम आहे’ या तिसऱ्या वाक्याच्या अनुषंगाने राष्ट्रप्रेम भावनेबद्दलचा आशय हा विद्यार्थी व शिक्षक यांच्या आंतरक्रियेतून स्पष्ट केला आहे.
या पुस्तकातील पाठात “”भगतसिंह, राजगुरू, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते.” असा एका संवादात उल्लेख करण्यात आला आहे. याला ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्षेप घेतला आहे.
बालभारतीने केला खुलासा
भाषा विषय पाठ्यपुस्तकांच्या संदर्भात पाठ्यपुस्तकांमधील पाठ, कविता या मराठी भाषा विषय समिती व अभ्यास गटाकडून निवडण्यात येतात. त्यामुळे कुर्बान हुसेन यांचे क्रांतिकारक म्हणून समाविष्ट केलेले नाव योग्य आहे. कुर्बान हुसेन हे सोलापूरमधील स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांना दिनांक 12 जानेवारी 1931 रोजी सहकाऱ्यांसमवेत फाशी देण्यात आली होती. त्यामुळे कुर्बान हुसेन या नावाचा उल्लेख चुकीने करण्यात आला आहे, असे म्हणणे संयुक्तिक नाही असे प्रभारी संचालक विवेक गोसावी यांनी सांगितले.