अवघ्या 17 दिवसांत तब्बल 15,935 बाधित वाढले
मृतांची संख्याही आता हजाराचा आकडा गाठणार
सागर येवले
पुणे – करोनाने शिरकाव करताच चार महिन्यांत (दि. 9 मार्च ते 30 जून) शहरातील बाधितांची एकूण संख्या 18,105 वर पोहोचली. मात्र, जुलैमध्ये या विषाणूचा उद्रेक झाल्याचे दिसत आहे. अवघ्या सतरा दिवसांत (दि.1 ते 17 जुलै) बाधितांची संख्या तब्बल 15 हजार 935 ने वाढली असून, मागील चार महिन्यांतील बाधित संख्येच्या जवळपास ही संख्या पोहचली आहे. त्यामुळे पुढील 13 दिवस करोनाची काय स्थिती असणार, याची चिंता प्रशासकीय पातळीवर वाढली आहे.
पुणे शहरात करोना बाधितांची एकूण संख्या 35 हजार 848 वर पोहोचली आहे. दि.9 मार्च रोजी पुण्यात पहिला बाधित सापडल्यानंतर दि.30 जूनपर्यंत 1 लाख 20 हजार संशयितांच्या केलेल्या तपासणीतून शहरात एकूण 18 हजार 105 बाधित सापडले. तर 662 जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे; परंतु जुलै सुरुवात झाला आणि करोनाचा उद्रेक सुरू झाला. बाधितांची संख्या दररोज नवीन उच्चांक गाठत आहे. त्यामध्ये दि.16 जुलै रोजी तब्बल 1,812 बाधित संख्येने उच्चांक गाठला असून, शुक्रवारी (दि.17) 1,705 तर बुधवारी (दि. 15) 1,416 बाधित सापडले आहेत.
दरम्यान, मागील सतरा दिवसांत करोनामुळे तब्बल 255 बाधितांचा मृत्यू झाला आहे. दररोज 15 ते 20 जणांचा मृत्यूची नोंद होत असून, पुढेही असेच प्रमाण राहिले तर एकट्या पुणे शहरात पुढील आठ ते दहा दिवसांत मृत्यूची संख्या हजाराचा टप्पा पार करण्याची भीती आहे. तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील (पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण) मृतांची संख्या 1 हजार 243 वर पोहोचली आहे.
टेस्टही “रॅपिड’ली
शहरातील तपासणी संख्या वाढल्यामुळे बाधितांची संख्या वाढल्याचे महापालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते. शहरात दि. 17 जुलैअखेर 1 लाख 91 हजार 508 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात 34 हजार 40 बाधित सापडले. तर अवघ्या सतरा दिवसांत (1 ते 17 जुलै) 71 हजार 450 संशितांची तपासणी केली असून, त्यातील 16 हजार 275 जणांची रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करण्यात आली आहे.
करोनामुक्तीही वेगाने…
जुलैमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसते. तर, करोनामुक्तांचे प्रमाणही वाढत आहे. मागील चार महिन्यांत 11 हजार 40 बाधित करोनामुक्त झाले आहेत. तर जुलैमध्ये अवघ्या सतरा दिवसांत तब्बल 10 हजार 97 बाधित ठणठणीत बरे झाले आहेत. त्यामुळे शहरातील करोनामुक्तीचे प्रमाण काही अंशी समाधानकारक ठरत आहे