इमारत उभारली परंतु अन्य कामे प्रलंबित; तीन वर्षांची मुदत संपुष्टात
पिंपरी – महापालिकेच्या थेरगाव-बापुजीबुवानगर येथील 200 खाटांची रुग्णालय इमारत उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. तथापि, रुग्णालय इमारतीतील विद्युतविषयक आणि फ्लोअरिंगची कामे सध्या सुरू आहेत. मार्च अखेरपर्यंत दिलेल्या मुदतवाढीच्या कालावधीत हे काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर आहे. सर्व कामे पूर्ण होण्यासाठी मे महिना उजाडणार आहे.
रूग्णालयाचे बांधकाम क्षेत्र एकूण 15018 चौरस मीटर इतके आहे. संबंधित रूग्णालयासाठी 48.93 कोटी रुपये इतका खर्च मंजूर करण्यात आला आहे. रूग्णालय इमारतीत तळमजला आणि तीन मजल्यांचा समावेश आहे. त्याशिवाय, चारचाकी, दुचाकी, सायकल पार्किंग, मेडिकल गॅस पुरवठा व्यवस्था आणि शवागर यांच्यासाठी स्वतंत्र पार्किंग फ्लोअरची सुविधा केलेली आहे.
रूग्णालयात भाजलेल्या रूग्णांसाठी तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा करण्यात येणार आहे. रूग्णालयात बाह्यरूग्ण विभाग, “क्ष’ किरण तपासणी, अल्ट्रासोनोग्राफी, मॅमोग्राफी व सी.टी.स्कॅन, प्रशस्त प्रतीक्षागृह व स्वच्छतागृह, उपहारगृह, चोवीस तास फार्मसी, जळीत विभाग ऑपरेशन थिएटर, रक्तसाठा व त्वचापेढी, अद्ययावत प्रसूतीगृह व नवजात शिशुंचा अतिदक्षता विभाग, बालरूग्ण अतिदक्षता विभाग, पॅथॉलॉजी लॅब, प्रशासन विभाग, अद्ययावत ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स (4 थिएटर्स), सर्जिकल विभाग, नेत्र व कान, नाक, घसा विभाग, अतिदक्षता विभाग आदी विभाग असणार आहेत. थेरगाव, काळेवाडी, वाकड परिसरातील नागरिकांसाठी हे रूग्णालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. रूग्णालय सुरू झाल्यानंतर नागरिकांना घराजवळ कमी दरात चांगली वैद्यकीय सुविधा मिळू शकणार आहे.
मुदतवाढ देण्याची नामुष्की
थेरगाव येथील रूग्णालयाच्या उभारणीला 1 मार्च 2016 पासून सुरवात झाली. 31 जुलै 2019 पर्यंत काम पूर्ण करण्यासाठी मुदत दिली होती. तीन मजल्याची इमारत पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांपेक्षा अधिक मुदत देण्यात आली होती. परंतु इतर कामांप्रमाणे थेरगाव रुग्णालयाचे कामही खूपच संथगतीने सुरु राहिले. पर्यायाने काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्याची नामुष्की पिंपरी-चिंचवड महापालिकेव ओढावली. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्याने या कामासाठी मार्च-2020 अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे.
रुग्णालयातील प्रमुख सुविधा :
सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, अत्याधुनिक अग्निशामक व्यवस्था, वातानुकूलित व्यवस्था, उपहारगृह, बॅंक एक्सटेंशन काऊंटर, दिशादर्शक, ध्वनीक्षेपण व्यवस्था, संगणक कक्ष, फार्मसी, प्रशस्त वाहनतळ, स्वच्छतागृह व थंड पिण्याचे पाणी, मेडिकल ऑक्सिजन पुरवठा कक्ष, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, तातडीच्या विद्युत पुरवठ्यासाठी डिझेल जनरेटर, युपीएसची सोय व इतर.
थेरगाव रूग्णालय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. विद्युतविषयक कामे, पेंटींग, फ्लोअरिंगचे कामे बाकी आहेत. ही कामे पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागेल. मे महिन्यापर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
– देवन्ना गट्टूवार, का. अभियंता