नवी दिल्ली – हैदराबादच्या बायोलॉजिकल-ई लिमिटेड सोबत केंद्र सरकारने करार केला असून या कंपनीकडून ऑगस्ट ते डिसेंबर या काळात तीस कोटी डोस केंद्र सरकार विकत घेणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने दीड हजार कोटी रुपयांची आगाऊ रक्कम कंपनीला दिली आहे. सध्या ही लस तिसऱ्या टप्प्याच्या ट्रायलमध्ये आहे.
बायोलॉजिकल-ई कंपनीचे डोस ऑगस्ट ते डिसेंबर या काळात तयार होणार असल्याची माहिती आहे. या आधीच्या दोन टप्प्यात लसीचे रिपोर्ट प्रभावी आले आहेत. बायोलॉजिकल-ई कंपनीकडून तयार करण्यात येणारी लस ही आरबीडी प्रोटीन सब-युनिट लस असून येत्या काही महिन्यात ती बाजारात येण्याची शक्यता आहे.
भारत सरकारकडून स्वदेशी लस निर्मितीला चालना देण्यात येत आहे. त्यासाठी विविध कंपन्यांना संशोधन आणि विकासाच्या कार्याला भारत सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येत आहे. बायोलॉजिकल-ई या कंपनीच्या लसीसाठी भारत सरकारकडून प्री क्लिनिकल ट्रायलपासून स्टेज तीनच्या अभ्यासापर्यंत मदत करण्यात आली आहे. या कंपनीला 100 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदत करण्यात आली असून इतरही प्रकारची सर्व मदत सरकारकडून करण्यात आली आहे.
सध्या देशात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचा लसीकरणाच्या कार्यक्रमात वापर केला जात आहे. रशियाच्या स्पुटनिक व्ही ची आयात करण्यात आली असून ती लवकरच वापरात येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन लस फायझरच्या वापरालाही या महिन्यापर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.