सिंगिंग रिऍलिटी शो इंडियन आयडॉल 12 कायम चर्चेत असतो. नवे टॅलेंट येथे पाहायला मिळते. एरव्ही संधी मिळाली नसती अशा गुणी कलाकारांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म या शोने दिला आहे.
मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून ते नवोदित कलाकार दुर्लक्षित झाले असून, एक वेगळाच तमाशा सुरू झाला आहे. महान पार्श्वगायक किशोर कुमार यांचे गायक चिरंजीव अमित कुमार आणि शोच्या निर्मात्यांमध्ये कथित वाद सुरू झाला असून त्यानेच सगळी जागा व्यापली आहे.
त्यावर आता आपले मौन सोडत गायक सोनू निगमने हा वाद थांबवण्याचा आणि त्याला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला आहे. अमित कुमार हे खूप मोठे आहेत. ते किशोर कुमार यांचे पुत्र आहेत.
त्यांनी असले काही उत्तर दिले असेल असे आपल्याला वाटत नाही. त्यांना प्रश्न फिरवून विचारला असेल आणि त्याला त्यांनी जे उत्तर दिले तेही फिरवून मांडले असेल असे आपल्याला वाटते असे सोनू निगमने म्हटले आहे.
या शोमधील जे स्पर्धक आहेत त्यांची खोटी प्रशंसा करण्यास आपल्याला सांगण्यात आले होते, असे अमित कुमार यांनी म्हटल्याचे प्रसिद्ध झाल्यानंतर हा वाद सुरू झाला. त्यानंतर अमित कुमार गप्प आहेत. त्यांनी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही.
पण त्यांच्यावर रोज वेगवेगळ्या माध्यमातून हल्लाबोल सुरू असल्याचे पाहून सोनू व्यथित झाला आहे. या शोसाठी त्यानेही अगोदर जज म्हणून काम केले असल्यामुळे या वादाने कोणाचे भले होणार नसल्याचे त्याने म्हटले आहे.
आपल्या संस्कृतीत मोठ्यांचा आदर केला जातो. त्यामुळे इंडियन आयडॉलवाल्यांनी गप्प बसावे आणि काही बोलू नये. अमित कुमार हे किशोर कुमार यांचे पुत्र आहेत.
ते शांत बसले आहेत. त्यांचा आदर केला जावा. त्यांच्या त्या शांततेचा, मौनाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नये, असेही सोनूने बजावले आहे.