पुणे – तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक बाधा होर हा अंदाज असून त्याची निर्माण झालेली भिती अनाठायी असल्याचे मत राज्याच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केले आहे. करोनाची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये सर्वाधिक बाधा लहान मुलांना होणार अशी, भिती पसरली आहे. मात्र याला कोणताच शास्त्रीय आधार नाही.
18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण होत आहे, त्यामुळे विषाणू स्वतःमध्ये बदल करून लहान मुलांमध्ये शिरकाव करेल, असा एक तर्क आहे. या तर्कालाही कोणताही आधार नाही, असे डॉ. आवटे यांचे म्हणणे आहे.
मुले बाधितचे प्रमाण नगण्यच…
सहा महिन्यांमध्ये पाच वर्षाखालील मुलांचे कोविड मुळे बाधित होण्याचे प्रमाण प्रत्येक महिन्यामध्ये साधारणपणे एकूण रुग्णांच्या एक ते दीड टक्के राहिले आहे. हे आजही बदलताना दिसत नाही, तथापि जेव्हा एकूण रुग्ण संख्या दोन लाखावरुन दहा लाखांवर जाते तेव्हा स्वाभाविकच दोन लाखापेक्षा दहा लाखातील दीड टक्का हे निव्वळ संख्येमध्ये अधिक असतात, हे आपण लक्षात घेत नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे लहान मुले जरी बाधित झाली तरी त्यांच्यामध्ये प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत गुंतागुंतीचे आणि मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. आपण, अगदी मे महिन्याचे उदाहरण घेतले तरी 18 वर्षाखालील मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण 0.07 एवढे आहे. साधारणपणे दहा हजार मुलांना हा आजार झाला तर त्यातील एकाचा मृत्यू होतो, असे हे सर्वसाधारण प्रमाण आहे, असे डॉ. आवटे यांचे म्हणणे आहे.
…अनुमान अशक्य
“इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रीक्स’ने तिसरी लाट आणि मुलांना धोका याबाबत स्पष्ट केले आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता आहे; पण, ती कधी येईल आणि किती तीव्र असेल याबाबत अनुमान करणे कठीण आहे. मोठ्या माणसाप्रमाणेच लहान मुलांनाही करोना होण्याची भीती असते पण तिसऱ्या लाटे मध्ये मुले सर्वाधिक बाधित होण्याची शक्यता अगदीच कमी आहे. 90 टक्के मुलांमधील करोना सौम्य स्वरूपाचा असतो. गंभीर करोनाचे प्रमाण मुलांमध्ये अत्यल्प आहे. काही मुलांना आयसीयूची गरज लागू शकते, पण त्याचे प्रमाण नगण्य असणार आहे. तरीही आपण तयारी केली आहे.
लहान मुलांमध्ये करोनाचे प्रमाण वाढू शकते त्या अनुषंगाने तयारी करतो आहोत, ही चांगली गोष्ट आहे. कोणतीही तयारी वाया जात नाही. आपल्या मुलांचे नियमित लसीकरण पूर्ण झाले आहे ना, याची खात्री करून घ्या. राहिलेल्या लसी नक्की आणि वेळेत पूर्ण करा. तिसऱ्या लाटेच्या भीतीने उगीच मुलावर नको ती बंधने घालू नका आणि स्वतः ही घाबरून जाऊ नका.
– डॉ. आवटे, साथरोग विभाग प्रमुख, महाराष्ट्र राज्य